सातारा : पोरीची फाईट…नराधमाची पुंगी टाईट | पुढारी

सातारा : पोरीची फाईट...नराधमाची पुंगी टाईट

सातारा : विठ्ठल हेंद्रे
शहरातील मुलीचे अपहरण करुन तिच्यावर पाशवी अत्याचार झाल्याची घटना ताजी असतानाच सातारा तालुक्यात उसतोड कामगाराच्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाला. नराधमाची झडप पडताच 13 वर्षीय मुलीने प्रतिकार करत संशयित आरोपीला फाईट देत त्याचीच पुंगी टाईट केली. या घटनेत संशयित किरकोळ जखमी झाला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

सातारा शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून 4 वर्षीय मुलीचे दि. 21 मार्च रोजी अपहरण करुन सोनगावच्या हद्दीत तिच्यावर पाशवी अत्याचार करण्यात आले. तीन दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर त्या नराधमाच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. सातार्‍यातील घडलेल्या या घटनेने जिल्हा सुन्‍न असतानाच दि. 28 मार्च रोजी आणखी एका मुलीवर नराधमाने झडप घातल्याचे समोर आले. ही घटना सातारा तालुक्यातील एका गावात घडली आहे. संबंधित मुलगी 13 वर्षाची असून तिचे आई-वडील उसतोड कामगार आहेत.

राज्यातील एका टोकाच्या जिल्ह्यातून ते उदरनिर्वाहासाठी गेल्या काही महिन्यांपासून गावानजीक वास्तव्य करत आहेत. दि. 28 रोजी मुलगी पाणी आणण्यासाठी हातपंपावर गेली होती. यावेळी एकट्या मुलीला पाहून गावातीलच एक गर्दुल्‍ला तिच्या पाठीमागे गेला. दुपारची वेळ असल्याने परिसर निर्जन होता. मुलीने कळशी भरल्यानंतर ती पुन्हा तिच्या झोपडीकडे निघाली. मात्र संशयित गर्दुल्ल्याने त्या मुलीवर झडप घातली. मुलीला पकडून तिच्यावर गैरप्रकर करण्याचा प्रयत्न करताच मुलगी सुरुवातीला भेदरुन गेली. मात्र स्वत:ला सावरत तिने संशयित आरोपीला जोरदार ढकलून देत लाथ घातली. यावेळी संशयित होलपंडत तो पडला व त्यात किरकोळ जखमी झाला. यावेळी धावतपळत झोपडी गाठली व घडलेल्या घटनेची माहिती कुटुंबियांना दिली.

तात्काळ त्यांनी संशयिताचा शोध घेतला मात्र तो न सापडल्याने कुटुंबियांनी सातारा तालुका पोलिस ठाणे गाठले व संशयिताने केलेल्या कृत्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. संशयितावर गुन्हा दाखल झाल्यानंतर फौजदार अमित पाटील यांनी पोलिसांसोबत त्याचा शोध घेतला असता तो दवाखान्यात अ‍ॅडमिट असल्याचे समोर आले. पोलिसांनी सर्व माहिती घेतल्यानंतर संशयिताला किरकोळ दुखापत झाल्याने त्याला दुसर्‍या दिवशी डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

सोलापूर ग्रामीणच्या मॉडेलचा आदर्श घ्यावा…

एकाच आठवड्यातील दोन घटनांनी सातारा शहरासह तालुका हादरुन गेला आहे. यामुळे पोटाचा गुजराण करण्यासाठी जे वंचित घटक आहेत तेथील मुली व महिलांचा प्रश्‍न कमालीचा ऐरणीवर आला आहे. स्थानिक प्रशासनाने मनावर घेवून ज्या वंचित घटकासाठी योजना आहेत त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची गरज निर्माण झाली आहे. सोलापूर ग्रामीणच्या एसपी तेजस्वी सातपुते यांनी नुकतेच याबाबत प्रशासनाला आदर्शवत ठरेल असे काम केले आहे. सातारा प्रशासनाने असे काम करण्याची गरज निर्माण झाली आहे.

सातारा तालुक्यातील उसतोड कामगार मुलीचा विनयभंग झाल्यानंतर तात्काळ पोलिसांनी माहिती घेवून तपास केला. संशयिताला अटक केली असून याप्रकरणात कठोर शासन होण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.
पो.नि. : विश्‍वजीत घोडके, सातारा तालुका पोलिस ठाणे.

Back to top button