‘किसनवीर’च्या फडात आ. महेश शिंदे पूर्ण ताकदीने लढणार | पुढारी

‘किसनवीर’च्या फडात आ. महेश शिंदे पूर्ण ताकदीने लढणार

सातारा ; पुढारी वृत्तसेवा : कोरेगाव व सातारा तालुक्यांतील ऊस उत्पादक शेतकर्‍यांवर होत असलेला अन्याय दूर करण्यासाठी व किसनवीर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील अन्य तालुक्यांतील सभासदांमधून ‘कारखाना वाचवा’ ही माझ्याकडे होत असलेली मागणी लक्षात घेऊन किसनवीर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक पूर्ण ताकदीने लढविण्याचा माझा इरादा असल्याची माहिती आ. महेश शिंदे यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना दिली.

किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र पाच तालुक्यांमध्ये येते. पैकी दोन तालुक्यांमध्ये सध्या आ. महेश शिंदे यांचे राजकीय वर्चस्व आहे. यापूर्वीही किसनवीर कारखान्याच्या निवडणुकीत कोरेगाव तालुक्याची भूमिका निर्णायक राहिली आहे. डॉ. शालिनीताई पाटील यांनी मदनदादा भोसले

यांना त्या काळात मदत केली होती. किसनवीर कारखान्यात सध्या बरेच रणकंदन सुरू आहे. आ. मकरंद पाटील व नितीनकाका पाटील यांनी दोनच दिवसांपूर्वी कारखान्याची निवडणूक लढवण्याचा निर्धार केला. त्यातच आ. महेश शिंदे यांनीही गुरूवारी ‘पुढारी’शी बोलताना आपण पूर्ण ताकदीने किसनवीर कारखान्याची निवडणूक लढवण्याच्या विचारात आहोत, असे सांगितले.

कोरेगाव व सातारा तालुक्यातील ऊस उत्पादक सभासदांनी माझ्याकडे येवून आपण किसनवीर कारखाना लढवला पाहिजे, अशी मागणी केली आहे. यापूर्वी मी कुणाच्या कार्यक्षेत्रात हस्तक्षेप करत नव्हतो मात्र काहीजण माझ्या कार्यक्षेत्रात येवून हस्तक्षेप करत आहेत. किसनवीर कारखान्याचे कार्यक्षेत्र तर माझ्या राजकीय कार्यक्षेत्रातच येते. त्यामुळे माझ्या कार्यकर्त्यांच्या मागणीचा विचार करून मला निवडणूक लढवण्याच्या निर्णयापर्यंत यावे लागले आहे.

माझ्या काही समर्थकांचे अर्जही मी दाखल करत आहे. केवळ सातारा, कोरेगावच नव्हे तर खंडाळा, वाई व जावली तालुक्यातूनही अनेकांचे मला कारखान्याची निवडणूक लढवण्यासंदर्भात फोन येत आहेत. या सर्वांचा विचार करून समविचारी लोकांना बरोबर घेवून आम्ही निवडणूक लढवण्याच्या विचारात आहोत, असेही आ. महेश शिंदे म्हणाले.

आ. महेश शिंदे यांनी किसनवीर कारखान्याच्या फडात उडी घेतल्याने एकतर्फी वाटणारी ही निवडणूक अचानकपणे रंगतदार झाली आहे. मदनदादा भोसले व आ. महेश शिंदे एकत्र येणार का? आ. मकरंद पाटील व आ. महेश शिंदे एकत्र येतील का? की तीन स्वतंत्र पॅनल होतील? खा.श्री.छ. उदयनराजे भोसले, आ. शिवेंद्रराजे भेासले यांच्या भूमिका काय राहतील? हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे.

Back to top button