‘महाराष्ट्र केसरी’ किताबावर कोल्हापूरचीच पकड

‘महाराष्ट्र केसरी’ किताबावर कोल्हापूरचीच पकड

सातारा ; विशाल गुजर : कुस्तीपंढरी म्हणून ओळख असणार्‍या कोल्हापूरच्या मल्लांचा मानाच्या महाराष्ट्र केसरी किताबावर आजही दबदबा कायम आहे. आतापर्यंत झालेल्या 63 महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरच्या पैलवानांनी समोरच्या पैलवानाला अस्मान दाखवत तब्बल 16 वेळा 'महाराष्ट्र केसरी'ची गदा जिंकली आहे. मात्र, गेली 21 वर्षे कोल्हापूरला 'महाराष्ट्र केसरी'ने हुलकावणी दिली आहे. दरम्यान, कोल्हापूरनंतर पुणे, सांगली व सोलापूरच्या मल्लांनी 7 वेळा या स्पर्धेची गदा पटकावली आहे.

पुण्यात 1953 मध्ये महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेची स्थापना झाली. 1959 पासून हिंदकेसरी स्पर्धा सुरू झाली आणि पहिलीच मानाची गदा कुस्तीपंढरीच्या सांगलीतील श्रीपती खंचनाळे यांनी जिंकण्याचा महापराक्रम केला. यानंतर पुन्हा एकदा हिंदकेसरी प्रमाणेच महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेण्याचे निश्चित झाले.

1961 मध्ये औरंगाबाद येथे झालेल्या अधिवेशनापासून सांगलीच्या दिनकर दह्यारी यांनी विरोधी मल्लाला चितपट करून महाराष्ट्र केसरी अजिंक्य परंपरेचा श्रीगणेशा केला. त्यानंतर आजपर्यंत आढावा पाहिला तर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत अनेक बदल होत गेले. मातीवर होणार्‍या कुस्त्या आता गादीवरही होऊ लागल्या. आतापर्यंत 63 महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा झाल्या आहेत. राजर्षी शाहूंच्या काळापासून कुस्तीपंढरी म्हणून कोल्हापूरचा नावलौकिक आहे.

सर्वाधिक 16 वेळा महाराष्ट्र केसरी स्पर्धेत अजिंक्यपद मिळवून कोल्हापूरच्या मल्लांनी निर्विवाद वर्चस्व राखले. 2000 साली कोल्हापूरच्या विनोद चौगुलेने महाराष्ट्र केसरीचे अजिंक्यपद पटकवल्यानंतर सलग 21 वर्षे कोल्हापूरला अजिंक्यपदाची प्रतीक्षा लागून राहिली आहे. पुणे, सांगली व सोलापूर जिल्ह्याने आजपर्यंत प्रत्येकी 7 वेळा 'महाराष्ट्र केसरी'ची गदा पटकावली आहे.

मुंबईने 5 वेळा, सातारा 4 वेळा, जळगाव 3, बीड व नाशिक 2 तर बुलढाणा, अहमदनगर व लातूर या तीन जिल्ह्यांनी प्रत्येकी एक वेळा 'महाराष्ट्र केसरी'वर नाव कोरले आहे. तर 1963 व 96 साली महाराष्ट्र केसरी लढतीसाठी मल्ल आले नसल्याने स्पर्धा रद्द करण्यात आली होती. 1989, 1990, 1991 या सलग तीन वर्षे अंतिम लढत अनिर्णीत झाल्याने कोणत्याही मल्लास चांदीची गदा देण्यात आली नव्हती. गेले दोन वर्षे सुरू असलेल्या कोरोनामुळे 2020 व 21 ची महाराष्ट्र केसरी स्पर्धा रद्द करण्यात आली होती.

दरम्यान, यामध्ये 1964 व 65 गणपतराव खेडकर, 1967 व 68 चंबा मुत्नाळ, 1970 व 71 दादू मामा चौगले, 1972 व 73 लक्ष्मण वडार या मल्लांनी डब्बल महाराष्ट्र केसरीचा बहुमान पटकावला आहे. तसेच 2014, 2015 व 16 असे सलग तीन वेळा जळगावच्या विजय चौधरी तर 2011, 2012 व 13 या काळात सलग तीन वर्षे नरसिंग यादव यांनी 'महाराष्ट्र केसरी' जिंकत आले होते. गेल्या 7 वर्षांत केवळ 3 'महाराष्ट्र केसरी' झाले असून यापैकी 3 वेळा ही स्पर्धा पुण्याच्या बालेवाडी मैदानावर झाली. यात एकदाच पुण्यातील मल्ल अभिजित कटकेने मानाचा किताब पटकावला असून त्यावेळी सातारच्या किरण भगत याला गुणांवर त्यांनी चितपट केले होते.

सातारा यंदा पंचकार मारणार का?

आतापर्यंत झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सातारा जिल्ह्यातील चारजणांना 'महाराष्ट्र केसरी'चा किताब मिळाला आहे. या चार मल्लांनी विरोधी पैलवानांना अस्मान दाखवत 'महाराष्ट्र केसरी'वर मोहर उमटवली आहे. यात 1981 साली ढवळ (फलटण) येथील बापू लोखंडे यांनी कोल्हापूरच्या सरदार कुशाल याला चितपट करत 'महाराष्ट्र केसरी'ची पहिली गदा जिल्ह्यात आणली होती. त्यानंतर 1994 साली आटके (कराड) येथील संजय पाटील यांनी सोलापूरच्या मौला शेख याला, 1998 रोजी मिरगाव (फलटण) च्या गोरखनाथ सरकने सोलापूरच्या मौला शेखला तर 1999 साली धनाजी फडतरे नागाचे कुमठे (खटाव) यांनी राजेश गरगुजे याला चितपट केले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news