

कराड : चंद्रजीत पाटील
कराड दक्षिण, कराड उत्तर आणि पाटण अशा तीन विधानसभा मतदारसंघात विभाजन झालेल्या कराड तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीपूर्वी जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांची पुनर्रचना होणार आहे. त्यामुळे प्रत्येक गट व गण यातील राजकीय समीकरणे बदलणार आहे. या पार्श्वभूमीवर कोणाला लॉटरी लागणार? कोणीची गोची होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात सध्यस्थितीत येळगाव, काले, रेठरे बुद्रूक, वडगाव हवेली – कार्वे, कोळे – विंग या पूर्ण जिल्हा परिषद गटांचा समावेश आहे. तर सैदापूर जिल्हा परिषद गटातील काही गावे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात समाविष्ट आहेत. त्याचप्रमाणे वारूंजी या जिल्हा परिषद गटातील काही गावे पाटण विधानसभा मतदारसंघात समाविष्ट आहेत. याशिवाय तांबवे जिल्हा परिषद गट पाटण विधानसभा मतदारसंघात आहे. कोपर्डे हवेली, मसूर, उंब्रज, पाल असे चार जिल्हा परिषद गट कराड उत्तरमध्ये समाविष्ट आहे. उंब्रज जिल्हा परिषद गटातील काही गावे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात समाविष्ट आहेत.
सध्यस्थितीत 2012 मधील निवडणुकीपासून जवळपास 10 वर्षे सभापतीपद पालकमंत्री बाळासाहेब पाटील गटाकडे आहे. तर उपसभापती पद स्व. विलासराव पाटील उंडाळकर गटाकडे कायम आहे. 2012 साली आ. पृथ्वीराज चव्हाण व स्व. विलासराव पाटील उंडाळकर गटाचे समर्थक मानले जाणारे अपक्ष आणि काँग्रेसच्या पक्ष चिन्हावर विजयी झालेल्या उमेदवारांचे बहुमत झाले होते. मात्र, काँग्रेसतंर्गत मतभेदांमुळे राष्ट्रवादीला सभापती पदाची लॉटरी लागली होती. तर बहुमत मिळूनही काँग्रेसला ऐनवेळी एक सदस्य गैरहजर राहिल्याने विरोधात बसावे लागले होते. 2012 मधील निवडणुकीच्या तुलनेत मागील निवडणुकीत पालकमंत्री बाळासाहेब पाटील गटाच्या दोन जागा कमी होऊन राष्ट्रवादीला 7 जागांवर समाधान मानावे लागले होेते. तर स्व. विलासराव पाटील उंडाळकर गटालाही 7 जागा मिळाल्या होत्या.
तत्कालीन परिस्थितीत काँग्रेस व भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी पुन्हा राष्ट्रवादी व उंडाळकर गट एकत्र आले होते आणि पंचायत समितीत हे दोन्ही गट आजही एकत्र आहेत. मात्र, जिल्हा बँक निवडणुकीपासून समीकरणे बदलली आहेत. आता पुनर्रचनेनंतर कराड तालुक्यात चार पंचायत समिती सदस्य वाढणार आहेत. येळगाव, तांबवे – सुपने, कोळे – विंग हा विभाग आ. पृथ्वीराज चव्हाण व अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर गटाची जमेची बाजू मानला जातो. तर कराड उत्तरमधील चारही जिल्हा परिषद गट राष्ट्रवादीची जमेची बाजू मानली जातात.
रेठरे बुद्रक, वडगाव हवेली – कार्वे विभाग भाजपसाठी जमेची बाजू मानली जातात. त्यामुळेच कराड दक्षिणेत काँग्रेसला डॅमेज करत जितक्या जास्त जागा भाजपच्या पदरात पडतील, तितके राष्ट्रवादीचे सत्तेचे गणित सोपे होणार असे मानले जात आहे. तर कराड दक्षिणमधील बहुतांश जागांवर विजय मिळवत 2007 प्रमाणे कराड उत्तरमध्ये पाल, मसूर विभागात ज्याप्रमाणे चमत्कार घडवला होता, तसाच चमत्कार घडवत काँग्रेसला पंचायत समितीत बहुमत मिळवणे सहजशक्य असल्याचे मानले जात आहे. त्यातच आता पुनर्रचनेनंतर चार पंचायत समितीच्या जागा वाढणार असल्याने स्वबळावर सत्ता मिळवण्याची काँग्रेसला संधी आहे. त्याचवेळी राष्ट्रवादीला कराड उत्तरमध्ये कराड दक्षिणच्या तुलनेत कमी जागा असल्याचा फटका बसण्याची शक्यता आहे.
त्यामुळेच उत्तरमधील सर्व जागांवर विजय मिळवत बहुमतासाठी आवश्यक उर्वरित जागांसाठी अन्य पक्षांची मदत घ्यावी लागेल, असेही बोलले जात आहे. त्यामुळेच पुनर्रचनेनंतर समीकरणे बदलणार असून काँग्रेसला संधी मिळेल. त्याचवेळी राष्ट्रवादीला वर्चस्व राखण्यासाठी सर्व प्रतिष्ठा पणास लावावी लागणार अशी चर्चा सध्यस्थितीत सुरू आहे.
काले जिल्हा परिषद गटात भीमराव पाटील गटाची ताकद मोठी आहे. हा गट भाजपसोबत असेल, अशीच सध्यस्थिती आहे. त्यामुळेच या गटात काँग्रेस व भाजपमध्ये मोठी चुरस होईल असे बोलले जात आहे. तर सैदापूर आणि वारूंजी विभागात पालकमंत्री बाळासाहेब पाटील गटाची मोठी ताकद आहे. त्यामुळे दोन्ही काँग्रेसमध्ये चुरस पहावयास मिळणार असून हे तिन्ही विभाग सत्ता समीकरणात निर्णायक ठरतील, अशी चिन्हे आहेत.