सातारा : महाराष्ट्र केसरीसाठी ९०० मल्‍ल भिडणार; प्रशासनाकडून युध्दपातळीवर नियोजन | पुढारी

सातारा : महाराष्ट्र केसरीसाठी ९०० मल्‍ल भिडणार; प्रशासनाकडून युध्दपातळीवर नियोजन

सातारा : विशाल गुजर
राजधानी सातार्‍याला तब्बल 59 वर्षांनी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा बहुमान मिळाला आहे. या स्पर्धेत राज्यभरातील 900 मल्ल, 100 पंच आणि टीम मॅनेजर असे एकूण 1100 जण सहभागी होणार आहेत. 50 हजारांहून अधिक प्रेक्षक स्पर्धेत येतील, यादृष्टीने तयारी सुरु करण्यात आली आहे. स्पर्धेच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री ना. उध्दव ठाकरेयांना आणण्याच्या हालचाली सुरू आहेत. तर महाराष्ट्र केसरीची गदा मात्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्याच हस्ते देण्यात येणार आहे.

1963 साली सातार्‍यात महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाली होती. या स्पर्धेत 365 मल्लांनी सहभाग घेतला होता. यावेळी स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीसांचे वितरण करण्यात आले होते. मानाच्या कुस्तीसाठी एकही स्पर्धक नसल्याने कोणालाही मानाची गदा देण्यात आली नाही. त्यामुळे महाराष्ट्र केसरीची लढत झालीच नव्हती.59 वर्षानंतर महाराष्ट्र केसरीचा बहुमान जिल्ह्याला मिळाला आहे. दि. 4 ते 9 एप्रिलला जिल्हा क्रीडा संकुल येथे ही स्पर्धा पार पडणार आहे. या स्पर्धेची जिल्हा प्रशासन व क्रीडा विभागाकडून युध्दपातळीवर तयारी सुरू आहे. कुस्तीगीर परिषदेवर कुस्ती आखाड्याची जबाबदारी असून याची तयारी पदाधिकार्‍यांकडून करण्यात येत आहे.

या स्पर्धेसाठी राज्यभरातून 900 मल्ल, 100 पंच आणि टीम मॅनेजर असे एकूण 1100 जण येणार आहेत. त्या मल्लांची निवासाची व्यवस्था रयत शिक्षण संस्थेच्या वसतिगृहाच्या शाळा व आयटीआयच्या वसतिगृहात करण्यात येणार आहे तर आयटीआय येथे सर्वांच्या भोजनाची व्यवस्था केली आहे. पंच व क्रीडाधिकार्‍यांची राहण्याची सोय जिल्ह क्रीडा संकुलात करण्यात आली आहे. पाणी व अन्य मुलभूत सुविधा देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही सुरू आहे. याशिवाय मैदानावरील सुविधांसह 50 हजार प्रेक्षक बसणार्‍या ठिकाणची रंगरंगोटीसह अन्य कामे सुरू करण्यात आली आहेत.

जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर पाच आखाडे असणार असून यात 2 मातीचे आखाडे तर 3 गादीचे मॅट दिसणार आहेत. या पाच मॅटवर कुस्त्या होणार आहेत. याशिवाय कोच, खेळाडू तसेच व्हीआयपी व्यक्ती बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे. याशिवाय मल्ल तसेच कोच यांच्यासाठी आवश्यक त्या सुविधाही मैदानावर उपलब्ध असणार आहे. ही स्पर्धा ऐतिहासिक व्हावी यासाठी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद व जिल्हा प्रशासकीय यंत्रणेकडून नियोजन सुरु आहे. या स्पर्धेच्या उदघाटनाची खुद्द मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांना आणण्याच्या हालचाली सुरु आहेत. मात्र, महाराष्ट्र केसरीची गदा खा. शरद पवार यांच्या हस्ते देण्यात येणार आहे.

आखाड्यासाठी लागणार 100 कामगार

कुस्ती स्पर्धेला दि. 4 एप्रिलला सुरुवात होणार आहे. त्या अगोदर आठवडाभर आखाडा तयार करण्यास सुरुवात केली जाणार आहे. यात मातीचे दोन आखाडे व गादीचे 3 अशा 5 आखाड्यासाठी 100 कामगार, मंडप, स्टेज, गॅलरी बांधण्यासाठी 250 हून अधिक कामगार तर बॅरिकेट्ससाठी 50 कर्मचारी लागणार आहेत. जिल्हा क्रीडा संकुलात स्पर्धा होणार असल्याने याठिकाणी सध्या रंगरंगोटी काम सुरु असून त्याच्यासाठी 30 कामगार काम करत आहेत.

Back to top button