सातारा : पुढारी वृत्तसेवा
सातारा जिल्ह्यात 7 हजार 277 पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत आहेत. या पाण्याच्या स्त्रोतांची गावपातळीवर ग्रामपंचायतींनी काळजी घेवून शाश्वत संरक्षणासाठी कार्यरत राहणे गरजेचे आहे. यादृष्टीने प्रशासन पावले टाकत आहे. नैसर्गिक स्त्रोतांच्या बळकटीकरणाबरोबरच नवीन स्त्रोतांच्या निर्मितीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
जागतिक जलदिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पाणी स्त्रोतांबाबतचा आढावा घेण्यात आला. विहीर, तलाव बांध आणि धरणे ही मानवनिर्मित स्त्रोत आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साठवण्यात येते. पाण्याचा वापर प्रत्येक क्षणाला आणि प्रत्येक ठिकाणी होत असतो. वाढत्या गरजा व शहरीकरणामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणावर नासधूस होत असते. त्यासाठी अलीकडच्या काळात पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे.जिल्ह्यात सातारा 872, कोरेगाव 666, खटाव 1 हजार 380, माण 712, फलटण 866, खंडाळा 196, वाई 417, जावली 475, महाबळेश्वर 272, कराड 745, पाटण 676 असे मिळून 7 हजार 277 पाणी स्त्रोत आहेत. या पाणी स्त्रोतांच्या बळकटीकरणासाठी ग्रामपंचायतीचा पुढाकार आवश्यक आहे.
ग्रामीण भागामध्ये पाण्याचे महत्व, वापर हाताळणी याबाबत जनजागृती व्हावी, यासाठी जागतिक जलदिनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्तरावर शालेय विद्यार्थ्यांमार्फत शालेय स्वच्छता फेरी, विद्यार्थी व गावकरी यांच्या सहभागाने स्वच्छता दिंडी पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची परिसर स्वच्छता करणे, स्त्रोतांची क्लोरिनेशन प्रात्यक्षिक करणे आदी उपक्रम गावपातळीवर राबवण्यात येणार आहेत. पाऊस पाणी संकलन तसेच पाण्याचा साठा वाढवण्यासाठी गाव परिसरात पावसाचे वाहते पाणी अडवून जमिनीत जिरवणे याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. याशिवाय जलप्रतिज्ञाही घेण्यात येणार आहे. याबाबतच्या सूचना पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्यांना देण्यात आल्या असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी किरण सायमोते व ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील शिंदे यांनी दिली.
जागतिक जलदिनाच्या निमित्ताने तालुका स्तरावर जलजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. गावात 100 टक्के वैयक्तीक नळकनेक्शन पूर्ण होवून 'हर घर जल ग्रामपंचायत' घोषित करण्यासाठी ग्रामपंचायतीमधील सरपंच, ग्रामसेवक व जलजीवन मिशनमध्ये समावेश असलेल्या ग्रामपंचायंतीची बैठक घेवून मार्गदर्शन करावे, यासह शालेय विद्यार्थी यांचा सहभाग घेऊन पथनाट्य सादर करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
जागतिक जल दिनाच्या पार्श्वभूमीवर तालुकास्तरावर राबवण्यात यावेत. त्या विविध उपक्रमांचा अहवाल जिल्हा कक्षास सादर करावा.
– विनय गौडा
मुख्य कार्यकारी अधिकारी