सातारा : सांगलीतील चिमुरडीवर अत्याचार

सातारा : सांगलीतील चिमुरडीवर अत्याचार
Published on
Updated on

सातारा ; पुढारी वृत्तसेवा : मूळ सांगली जिल्ह्यातील, मात्र सध्या सातार्‍यात फिरस्त्या असणार्‍या कुटुंबातील अवघ्या 4 वर्षीय चिमुरडीचे सोमवारी पहाटे अपहरण करून सोनगाव (ता. सातारा) गावच्या हद्दीत तिच्यावर पाशवी अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली. चिमुरडी रक्तबंबाळ अवस्थेत सापडली असून, तिला पुणे येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेने सातारा हादरला असून, नराधमाच्या शोधासाठी पोलिसांनी कसून मोहीम राबवली आहे.

सातारा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात गेल्या काही दिवसांपासून फिरस्ते असणारे एक कुटुंब वास्तव्यास आहे. त्यांचे नातेवाईक सातारा तालुक्यातील आहेत. या कुटुंबात चार वर्षांची मुलगी आहे. रविवारी रात्री नेहमीप्रमाणे हे कुटुंब झोपी गेले. पहाटे साडेसहा वाजता मुलीच्या आईला जाग आल्यानंतर तिला मुलगी दिसली नाही. मुलीचा परिसरात शोध घेतल्यानंतरही ती सापडत नसल्याने कुटुंब भयभीत झाले. तोपर्यंत दुसरीकडे सोनगाव गावच्या हद्दीत एका वस्तीलगत वृद्ध दाम्पत्याला संबंधित मुलगी निदर्शनास आली. तिची केविलवाणी अवस्था पाहून हे दाम्पत्यही गहिवरले. मुलीला तिच्या आई, वडिलांबाद्दल विचारल्यानंतर त्या मुलीने हाताने रस्त्याकडे बोट केले.

वृध्दाने त्या मुलीला घेवून ती दाखवते त्या रस्त्याकडे नेले. मात्र तेथे कोणीही नव्हते. पुन्हा त्या मुलीला शुध्दीवर आणत आईबाबत विचारल्यानंतर ती पुन्हा दुसरीकडे हात दाखवू लागली. वृध्दाने तिकडे जावून पाहिल्यानंतरही तेथे कोणी नसल्याने वृध्द दाम्पत्य गोंधळून गेले. मुलीची माहिती गावातील ग्रामस्थांना दिल्यानंतर त्यांनी सातारा तालुका पोलिसांना घटनेची माहिती दिली.

मुलगी रक्ताने माखलेल्या अवस्थेत असल्यामुळे सातारा तालुका पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मुलीची अवस्था पाहून तिला उपचारासाठी सिव्हीलमध्ये पाठवले. मुलीचा फोटो काढून पोलिसांनी परिसरात व उसतोड कामगारांकडे जावून तिची ओळख पटवण्याचे काम सुरु केले. सुमारे 8 वाजेपर्यंत पोलिसांची मोहिम सुरु होती. मात्र त्यात यश येत नव्हते. अखेर सातारा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील संबंधित कुटुंब पोलिस ठाण्यापर्यंत पोहचल्यानंतर त्याचवेळी सातारा तालुका पोलिसांना मुलगी सापडल्याचे समोर आले.

फोटो दाखवताच त्या कुटुंबाने ती मुलगी त्यांची असल्याचे सांगितले. तात्काळ मुलीच्या आईला व कुटुंबियांना सिव्हीलमध्ये नेले. मुलीवर प्राथमिक उपचार झाल्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले. तपासाच्या दृष्टीनेे व मुलीच्या तब्येतीमुळे तिला पुढील उपचारासाठी पुण्याला हलवले.

सीसीटीव्ही फुटेज मिळाले, पण…

मुलीवरील गंभीर घटनेनंतर पोलिसांची पथके तैनात केल्यानंतर बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात काही सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहेत. यामध्ये पहाटे एकजण दुचाकीवर पुढे बसवून लहान मुलाला नेत असल्याचे दिसत आहे. मात्र दुर्दैवाने त्यामध्ये अंधाराची वेळ असल्याने स्पष्ट दिसत नसल्याने अडचणी येत आहेत. तरीही पोलिस सर्व बाजूंनी तपास करत आहेत. यासाठी अनेकांची झाडाझडती घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news