पुढारी वृत्तसेवा
राज्याच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री ना. अजित पवार यांनी महाबळेश्वरच्या सर्वांगिण विकासासाठी या पर्यटनस्थळाचा एकात्मिक विकास आराखडा तयार करण्याचे जाहीर केले असल्याने आता आगामी काळात हे पर्यटनस्थळ आणखी सुशोभित होणार आहे.
या अर्थसंकल्पात त्यासाठी पर्यटन आराखडा तयार करुन नंतर त्यासाठी भरीव तरतूद करण्यात येणार आहे.
महाबळेश्वर हे जगप्रसिध्द पर्यटनस्थळ असून दरवर्षी 20 लाखांहून अधिक पर्यटक येथे भेट देऊन येथील निसर्गसौंदर्याचा आनंद लुटतात. मात्र, येथे अनेक सोयीसुविधांचा अभाव होता. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटन राज्यमंत्री आदित्य ठाकरे हे दोन वर्षांपूर्वी महाबळेश्वर येथे आले होते. त्यांनी राजभवन येथे बैठक घेत महाबळेश्वरच्या सर्वांगीण विकासासंदर्भात अधिकार्यांशी चर्चा केली होती. त्यानंतर लगेच राज्याच्या अर्थसंकल्पात शहर विकासासाठी तब्बल 100 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली. नंतर राज्य शासनाने आराखड्यानुसार एकूण 51 कोटी 99 लाख रुपयांच्या निधीस मान्यताही दिली. पहिल्या टप्प्यात 15 कोटी 60 लाख रुपयांचा निधी पालिकेकडे हस्तांतरीत करण्यात आला आहे. या निधीमधून शहरातील मुख्य बाजारपेठ सुशोभीकरणासह पेटिट लायब्ररी इमारतीचा जीर्णोद्धार व मोकळ्या जागेचे सुशोभीकरण या प्रमुख कामांचा समावेश आहे. 2022-2023 च्या राज्य अर्थसंकल्पातही उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री ना. अजित पवार यांनी महाबळेश्वर पर्यटनस्थळाचा एकात्मिक विकास आराखड्यासाठी तरतूद केली आहे.
गृह, न्याय विभागाला 2478 कोटींचा निधी
अर्थमंत्री ना.अजित पवार यांनी अर्थसंकल्पात गृह, न्याय व विधी विभागाला एकूण 2478 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. यामध्ये राज्यात 18 अतिरीक्त न्यायालये, 24 जलदगती न्यायालये, 14 कुटुंब न्यायालये उभारली जाणार आहेत. कमांडो भत्यात वाढ करण्यात आली आहे. गडचिरोली येथे विशेषोपचार रुग्णालय स्थापन केले जाणार आहे. यासोबतच महिला सुरक्षा व उपक्रमाची घोषणा करण्यात आली.