सातारा : पुढारी वृत्तसेवा
महापुरूष ज्या शाळेत शिकले त्या शाळा आयडॉल करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सातार्यातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतापसिंह हायस्कूल व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नायगाव येथील जि.प शाळेचा विकास केला जाणार आहे. यासाठी प्रत्येकी 1 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षितीजावर आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी दै. 'पुढारी'ने हा विषय मांडला होता. यावर ना. अजित पवार यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याने या शाळांचा आता विकास होण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे.विकसित केल्या जाणार्या या शाळांची स्वतंत्र इमारत असणार आहे. या ठिकाणी महापुरुषांचा इतिहास आणि विचार सांगणारे संग्रहालय असणार आहे. या शाळांच्या माध्यमातून नव्या पिढीसमोर महापुरूषांचा आदर्श ठेवला जाणार आहे.
शुक्रवारी झालेल्या अर्थसंकल्पात सातार्यातील प्रतापसिंह हायस्कूल व नायगाव येथील जि.प शाळेच्या विकासासाठी एक कोटींच्या निधीची तरतूद केली आहे. या शाळांमध्ये भौतिक सुविधा देण्याबरोबरच शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी व्यापक प्रयत्न केले जाणार आहेत.
अर्थसंकल्पात सातार्यातील दोन शाळांसह महात्मा फुले शिकलेले खानवडी, ता. पुरंदर येथील शाळा, राजर्षी शाहू महाराजांची कागल, जि. कोल्हापूर येथील शाळा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची वाटेगाव, जि. सांगली येथील शाळा, महर्षी धोंडो केशव कर्वे यांची मुरूड जि. रत्नागिरी येथील शाळा, साने गुरुजी यांची पालगड, जि. दापोली येथील शाळा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची मोझरी, जि. अमरवती येथील शाळा, संत गाडगेबाबा यांची शेंडगाव जि. अमरावती येथील शाळा व स्वातंत्र्यसैनिक क्रांतीसिंह नाना पाटील यांची येडेमच्छिंद्र, जि. सांगली येथील शाळा यांचा विकास होणार आहे.