

फलटण पुढारी वृत्तसेवा: दरोड्याच्या तयारीत असलेल्या 3 जणांच्या टोळीस फलटण शहर पोलिसांनी अटक करण्यात आली असून दोन जण पसार झाले आहेत. दरम्यान, संशयितांकडून धारदार शस्त्रे जप्त करण्यात आली.
तोसिफ उर्फ छोट्या अब्दुल शेख (वय 28), अक्षय बाळकृष्ण माने (वय 26) व अभिषेक ज्ञानेश्वर महेंद्रे ( वय 27, सर्व रा. फलटण), अशी संशयितांची नावे आहेत. तसेच अन्य दोघे पसार झाली आहेत.
फलटण शहर पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, पोलिस रेकार्डवरील गुन्हेगार अक्षय माने हा त्याच्या साथीदारांसह घातक शस्त्रे घेवून उपळवे मार्गावर वाहने अडवून दरोडा टाकणार आहे. तसेच जाधववाडी येथील साईमंदिरा समोर सर्वजण एकत्र जमणार असल्याची माहिती शहर पोलिस ठाण्याचे पोनि भारत किंद्रे यांना मिळाली.
या माहितीच्या आधारे पोनि किंद्रे यांनी पोलिस पथक तयार करुन साई मंदिर परिसरात सापळा लावला. दरम्यान, रात्री 1 वाजता गिरवीकडून एक सिल्व्हर रंगाची कार (क्र. एम एच 14 डी ए एफ. 1153) ही साईबाबा मंदिर परिसरात येवून थांबली. संबंधित कार संशयितांची असल्याची खात्री झालेल्या पोलिसांनी तत्काळ कारवाई केली.
दरम्यान, अंधाराचा फायदा घेवून दोघे संशयित पळून गेले. तर तोसिफ उर्फ छोट्या शेख, अक्षय माने व अभिषेक महेंद्रे या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यावेळी झडती घेतली असता एक चाकू, एक तलवार, काठी, सिल्व्हर रंगाचे हुंदाई वेरना कार, असा 8 लाख 12 हजार 550 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पळून गेलेल्या दोघांचा पोलिस शोध घेत असून याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. तपास फलटण शहर पोलिस करत आहेत.