सातारा : ठोसेघरमध्ये 140 हेक्टर वनक्षेत्र बेचिराख | पुढारी

सातारा : ठोसेघरमध्ये 140 हेक्टर वनक्षेत्र बेचिराख

परळी : पुढारी वृत्तसेवा : सातारा तालुक्यातील राजापूरी, परळी वन परिमंडल ठोसेघर नियतक्षेत्र फॉरेस्ट कंपार्टमेंटमध्ये सलग तीन दिवस लागलेल्या वणव्यामध्ये तब्बल 140 हेक्टर क्षेत्र बेचिराख झाले आहेत. वणवा आटोक्यात आणण्यासाठी अधिकार्‍यांची वानवा झाली आहे. या घटनेला संबंधित वनक्षेत्रपाल, वनपाल, वनरक्षक जबाबदार आहे. त्यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केली आहे. त्यामुळे त्यांची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

सातारा तालुक्यात राजापूरी, परळी वन परिमंडल ठोसेघर नियत क्षेत्र फॉरेस्ट कंपार्टमेंट नंबर 237 मध्ये शुक्रवारी रात्री वनवा लागला. यामध्ये 140 हेक्टर क्षेत्र भस्मसात झाले आहे. सलग तीन दिवस हा वनवा धुमसत होता. त्यात सुमारे 25 हेक्टरमध्ये चार वर्षांपूर्वी लावलेल्या जांभूळ, आवळा आदींसह कितीक वनौषधींची झाडे जळून खाक झाली. या वृक्षराजीच्या आश्रयाने राहणारे कित्येक पशुपक्षीही होरपळून मृत्युमुखी पडले.

शुक्रवारी हा वणवा लागला तेव्हा कोणीही जबाबदार वन अधिकारी व कर्मचारी तेथे उपस्थित नव्हता, किंवा आग आटोक्यात आणण्यासाठी त्यांनी प्रयत्नही केल्याचे दिसून येत नाही. नियुक्त शासकीय जबाबदारी आणि सामाजिक कर्तव्य यांचा विसर पडलेल्या वन अधिकारी व कर्मचार्‍यांच्या अक्षम्य डोळेझाकीने झालेल्या वनसंपत्तीच्या विनाशाला व मुक्या प्राण्यांच्या हत्येला जबाबदार ठरवून त्यांच्यावर ठोस कारवाई व्हायला हवी, अशी मागणी होत आहे.

या वनपरिक्षेत्राची जबाबदारी असणारे कोणीही जबाबदार अधिकारी व कर्मचारी नियुक्तीच्या गावी राहत नाहीत. तसेच त्यांचे फोनही ‘स्विच ऑफ’ असतात. त्यामुळे कोणतीही आपत्ती कोसळल्यास त्यांच्याशी संपर्क साधणे कोणालाही शक्य होत नाही. भरीत भर म्हणजे येथील वनपाल हे शुक्रवारी सुट्टीसाठी गावी जातात व थेट सोमवारीच येतात. अशा या बेजबाबदार व अनिर्बंध कर्मचार्‍यांमुळे ही परिस्थिती उद्भवत आहे.

वन समिती, ग्रामपंचायत काय करते?

ठोसेघर येथे वृक्षराजी मोठया प्रमाणात असून येथे ठोसेघर संयुक्त वनव्यस्थापन समिती कार्यरत आहे. या समितीकडून हा वणवा आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. तसेच ग्रामपंचयातीचाही या समितीत सक्रीय सहभाग असतो. मात्र, कृतीच्या नावाने ग्रामपंचायत सदस्यांची बोंब असते. अधिकार्‍यांनी जसे दुर्लक्ष केले तसेच दुर्लक्ष वन समिती व ग्रामपंचायतीनेही केले. त्यामुळे वणवा लागला तेव्हा हे काय करत होते? असा सवाल उपस्थित होत आहे.

Back to top button