सातारा: संपामुळे 500 एसटी बसेस अद्याप जागीच खिळून | पुढारी

सातारा: संपामुळे 500 एसटी बसेस अद्याप जागीच खिळून

सातारा पुढारी वृत्तसेवा: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सातारा विभागातील 11 आगारांमध्ये सुमारे 712 एसटी बसेस आहेत. मात्र काही कर्मचारी कामावर हजर झाले असले तरी एसटीच्या दररोज 150 ते 200 बसेसच्या विविध मार्गांवर फेर्‍या होत असल्या तरी अद्यापही एसटीच्या 500 चाकांना ब्रेकच आहे. त्यामुळे महामंडळाच्या आणखी तोट्यात भर पडत आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलिनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी एसटी कर्मचार्‍यांनी नोव्हेंबरपासून संप पुकारला आहे. संपाला 3 महिन्यांहून अधिक दिवस झाले असले तरी एसटी कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे एसटीची सेवा पूर्णपणे कोलमडली आहे.

मात्र महामंडळाने एसटी कर्मचार्‍यांना कामावर हजर राहण्यासंदर्भात नोटिसा बजावल्या होत्या. त्यानुसार आतापर्यंत सातारा विभागात सातारा, कराड, पाटण, वाई, महाबळेश्वर, पारगाव-खंडाळा, कोरेगाव, फलटण, दहिवडी, वडूज, मेढा या 11 आगारातील 174 चालक व 222 वाहक कामावर हजर झाले आहेत. जिल्ह्यात 750 एसटी बसेस आहेत हजर झालेल्या कर्मचार्‍यांच्या उपस्थितीत पुणे, मुंबई, सोलापूर, चिपळूण, कोल्हापूर, बोरिवली यासह तालुका ते जिल्हा तसेच ग्रामीण भागातही फेर्‍या सुरु आहेत.

दररोज एसटीच्या 150 ते 200 बसेसच्या माध्यमातून फेर्‍या होत असलेल्या बसेसना प्रवाशांचा प्रतिसाद मिळत आहे. मात्र ग्रामीण भागात जाणार्‍या प्रवाशांची कुचंबणा होत आहे. सध्या 750 बसेसपैकी सुमारे 200 बसेस विविध मार्गावर धावताना दिसत असल्या तरी एसटीच्या 500 चाकांना अद्यापही ब्रेकच आहे. त्यामुळे बहुतांश बसेस विविध आगार व बसस्थानकांमध्ये उभी असलेली पहावयास मिळत आहेत.

विविध आगारातील एसटी बसेस रॅन्डमली बाहेर काढल्या जातात. मात्र एकाच जागेवर उभ्या असलेल्या बसची चाके बसली आहेत. तर काही बसेस वापरात आणण्यासाठी प्रशासनाला प्रयत्न करावे लागत आहेत. एसटीच्या बहुतांश फेर्‍या बंद आहेत. त्यामुळे सर्वच प्रवाशांची गैरसोय होत आहे. अनेक प्रवाशी खासगी वाहनांचा आधार घेत आहे. मात्र ही वाहनेही वेळेवर उपलब्ध होत नाहीत.

या खासगी वाहनधारकाकडूनही मनाला वाटेल तसे भाडे आकारले जात आहे. त्यामुळे प्रवाशी व वाहनधारकांमध्ये वादावादीचे प्रकार घडत आहेत.सध्या बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. मात्र एसटी कर्मचार्‍यांचा संप सुरू असल्याने परीक्षा केंद्रापर्यंत या विद्यार्थ्यांना वेळेत पोहोचता येत नाही त्यासाठी परीक्षा कालावधीत तरी एसटी महामंडळाने विद्यार्थ्यांची गैरसोय होवू नये यासाठी एसटी बसेस विविध मार्गावर सोडाव्यात, अशी मागणी पालकांमधून होत आहे.

हेही वाचा 

Back to top button