सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे हाहाकार उडाला असून, आतापर्यंत 40 जणांचा मृत्यू झाला आहे, तर अन्य बेपत्ता असलेल्यांचा शोध सुरूच आहे. पाटण तालुक्यातील आंबेघर येथे 9 महिन्यांचे बाळ सापडले नसून त्याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान बचाव पथकापुढे आहे.
सातारा जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे वाई, पाटण, महाबळेश्वर, सातारा, जावली तालुक्यांत मोठ्या प्रमाणात जीवित हानी झाली. भूस्खलनामुळे 28 जण, छत पडून 1 जण, दरड कोसळल्यामुळे 2 जण, तर पुराच्या पाण्यामुळे 9 जणांचा मृत्यू झाला आहे.
वाई तालुक्यातील 3 जण, जावली तालुक्यातील 5 जण, पाटण तालुक्यातील 29 जण, सातारा तालुक्यातील 2 जण, तर महाबळेश्वर तालुक्यातील 1 जणांचा मृत्यू झाला आहे. वाई तालुक्यातील कोंढावळे येथील 2 महिलांचा भूस्खलनामुळे तर एका पुरुषाचा छत पडून मृत्यू झाला. जावली तालुक्यातील रेंगडी येथील 2 महिला, वाटंबे व मेढा येथील प्रत्येकी एकाचा पुराच्या पाण्यामुळे मृत्यू झाला आहे.
पाटण तालुक्यातील बोंद्री येथील एक पुरुष, जळव येथील एका पुरुषाचा पुराच्या पाण्यामुळे मृत्यू झाला आहे. मंद्रुळकोळे येथील एका पुरुषाचा दरड कोसळल्याने मृत्यू झाला आहे. आंबेघर तर्फ मरळी येथील 5 पुरुष व 6 महिलांचा तर काहीर येथील एका महिलेचा भूस्खलनामुळे मृत्यू झाला आहे. रिसवड येथील 2 पुरुष व 2 महिलांचा भूस्खलनामुळे मृत्यू झाला आहे. मिरगाव येथील 4 पुरुष व 4 महिलांचा भूस्खलनामुळे मृत्यू झाला आहे. आंबेघर येथील दोघांचा रविवारी उशिरा मृतदेह सापडल्याचे सांगण्यात आले.
सातारा तालुक्यातील कुस बु येथील एका महिलेचा व कोंडवे येथील एका पुरुषाचा पुराच्या पाण्यामुळे मृत्यू झाला आहे. महाबळेश्वर तालुक्यातील घावरी येथील एका पुरुषाचा दरड कोसळलयाने मृत्यू झाला.
पाटण तालुक्यातील भुस्खलनामुळे गाडले गेलेल्या लोकांचे तसेच जोर, ता. वाई येथे वाहून गेलेल्या दोघांचा शोध व बचाव काम वेगाने सुरु आहे. ही शोध मोहीम प्रगतीपथावर सुरु असल्याची माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली.
मृत व्यक्तींची नावे अशी…
राहीबाई मारुती कोंढावळकर (वय 75), भीमाबाई सखाराम वाशिवले (वय 52), वामन आबाजी जाधव (वय 65, सर्व रा. कोंढावळे, ता. वाई, जि. सातारा), तानाबाई किसन कासुर्डे (वय 50), भागाबाई सहदेव कासुर्डे (वय 50, दोघीही रा. रेंगडी, ता. जावली), जयवंत केशव कांबळे (वय 45, रा. वाटंबे, ता. जावली), वैभव तायापा भोेळे (वय 22, रा. बोंद्री, ता. पाटण), तात्याबा रामचंद्र कदम (वय 47, रा. जळव, ता. पाटण), सचिन बापूराव पाटील (वय 42, रा. मंद्रुळकोळे, ता.पाटण), रामचंद्र विठ्ठल कोळेकर (वय 55), मंदा रामचंद्र कोळेकर (वय 50), अनुसया लक्ष्मण कोळेकर (वय 45), सीमा धोंडीराम कोळेकर (वय 23), लक्ष्मी वसंत कोळेकर (वय 54), विनायक वसंत कोळेकर (वय 28), सुनिता विनायक कोळेकर (वय 24), विघ्नेश विनायक कोळेकर (वय 6), वेदिका विनायक कोळेकर (वय 3), मारूती वसंत कोळेकर (वय 21), लक्ष्मण विठ्ठल कोळेकर (वय 50, सर्व रा. आंबेघर तर्फ मरळी, ता. पाटण), उमा धोंडिबा शिंदे (वय 14, रा. काहिर, ता. पाटण), सुरेख बाबू कांबळे (वय 53), हरिबा रामचंद्र कांबळे (वय 75), पूर्वा गौतम कांबळे (वय 3), राहिबाई धोंडिबा कांबळे (वय 50, सर्व रा. रिसवड (ढोकावळे), ता. पाटण), आनंदा रामचंद्र बाकाडे (वय 50), मंगल आनंदा बाकाडे (वय 45), भूषण आनंदा बाकाडे (वय 17), शितल आनंदा बाकाडे (वय 14), यशोदा केशव बाकाडे (वय 68), वेदांत जयवंत बाकाडे (वय 8), मुक्ता महेश बाकाडे (वय 10), विजया रामचंद्र देसाई (वय 69, सर्व रा. मिरगाव, ता. पाटण), सुमन विठ्ठल लोटेकर (वय 65, रा. कुस बु॥, ता. पाटण), अमन ईलाही नालबंद (वय 21, रा. कोंडवे, ता. सातारा), विजय (अंकुश) मारूती सपकाळ (वय 29, धावरी, ता. महाबळेश्वर), अशी अतिवृष्टीमुळे मृत्यू झालेल्या 37 जणांची नावे प्रशासनाने प्रसिद्ध केली आहेत. रविवारी सायंकाळी जावली तालुक्यातील पुनवडी येथे एक मृतदेह मिळून आला. तो सहदेव गणपत कासुर्डे (वय 60, रा. रेंगडी, ता. जावली) यांचा आहे तर मिरगाव, ता. पाटण येथे आणखी दोन मृतदेह मिळून आले असून आत्तापर्यंत सापडलेल्या मृतांचा आकडा 40 झाला आहे तर बेपत्ता असलेल्या व्यक्तींची शोधमोहीम प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरू आहे.