सातारा : पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी देवरूखवाडीकरांना दिला धीर | पुढारी

सातारा : पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी देवरूखवाडीकरांना दिला धीर

वाई : पुढारी वृत्तसेवा

पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी देवरूखवाडीकरांना धीर दिला. अतिवृष्टीमुळे दरड कोसळलेल्या देवरूखवाडीची पाहणी पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी आ. मकरंद पाटील यांच्यासह केली.

यावेळी नुकसानग्रस्त ग्रामस्थांशी त्यांनी चर्चा करून धीर दिला. काळजी करू नका, शासन तुमच्या पाठिशी असल्याची ग्वाही त्यांनी दिली. त्यानंतर त्यांनी जांभळी येथील परिस्थितीचा आढावा घेतला.

देवरूखवाडी येथे अतिवृष्टीमुळे भूस्खलन झाल्याने 14 घरांवर दरड कोसळली होती. यामध्ये काही नागरिक व जनावरांचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर ना. पाटील यांनी पाहणी केली. यावेळी दुर्घटनेतील नुकसानग्रस्त ग्रामस्थांशी चर्चा केली. तसेच मयत झालेल्या कुटुंबातील सदस्यांचे सांत्वन केले.

यावेळी येथील नागरिकांनी पालकमंत्र्यांकडे समस्यांचे गार्‍हाणे मांडले. या परिसरात दरडी कोसळण्याचे प्रमाण जास्त असून येथे राहण्याची भीती वाटते. त्यामुळे येथील सर्व नागरिकांचे पुनर्वसन करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. यावर शासनपातळीवर या गावच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन ना. पाटील यांनी दिले.

देवरूखवाडी येथील धोकादायक घरांमधील व्यक्तींना गावच्या प्राथमिक शाळेत व मंदिरांमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. या नागरिकांची ना. पाटील यांनी भेट घेत त्यांना धीर दिला. याचबरोबर जांभळी येथील खचलेल्या जमिनीची पाहणीही त्यांनी केली. याचबरोबर बोटीद्वारे जोर, गोळेगांव, गोळेवाडी या गावातील परिस्थितीची पाहणी केली. यामध्ये भातशेती, पडलेली घरे, वाहून गेलेले बंधार्‍यांची पाहणी करून अपघातग्रस्त कुटूंबाना मदतीचे आश्वासन दिले. येथील नागरिकांनीही पुनर्वसनाची मागणी केली.

यावेळी कृषी सभापती मंगेश धुमाळ, उपसभापती विक्रांत डोंगरे, प्रांताधिकारी संगीता राजापूरकर, तहसिलदार रणजीत भोसले, उपविभागीय पोलीस अधिकारी शीतल जानवे-खराडे, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता पंकज गोंजारी, गटविकास अधिकारी उदयकुमार कुसुरकर, पोनि आनंदराव खोबरे, वनपरिक्षेत्र अधिकारी महेश झांजुर्णे, उपविभागीय बांधकाम अधिकारी श्रीपाद जाधव, संजय शिंदे, अजय गोळे उपस्थित होते.

Back to top button