भूस्खलन : आंबेघर, मिरगाव, ढोकावळेत १९ मृतदेह सापडले | पुढारी

भूस्खलन : आंबेघर, मिरगाव, ढोकावळेत १९ मृतदेह सापडले

मारूल हवेली (सातारा) : धनंजय जगताप

पाटण तालुक्याच्या मोरणा खोर्‍यातील खालचे आंबेघर येथे भूस्खलनामुळे मातीच्या ढिगार्‍याखाली दडपलेल्या घरातील 11 मृतदेह बाहेर काढण्यास प्रशासनाला यश आले. एनडीआरएफची टीम व स्थानिक नागरिकांच्या साहाय्याने मोठ्या शर्तीने हे मृतदेह बाहेर काढण्यात आले. तर आणखी 4 जण ढिगार्‍याखाली गाडल्याची शक्यता वर्तवली जात असून त्याचे शोधकार्य सुरू आहे.

दरम्यान, मिरगाव येथे भूस्खलनात 12 जण बेपत्ता झाले होते. यातील 6 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले असून 6 जणांचा शोध सुरू आहे. तर ढोकावळेभूस्खलनात 4 बेपत्ता झाले होते. यातील आत्तापर्यंत दोघांचे मृतदेह बाहेर काढले असून अन्य दोघांचा शोध सुरू आहे. असे तीन विविध ठिकाणच्या भूस्खलनातील बेपत्ता 31 पैकी 19 जणांचे मृतदेह हाती लागले आहेत.

लक्ष्मी वसंत कोळेकर (वय 55), विनोद वसंत कोळेकर (वय 35), मारुती वसंत कोळेकर (वय 22), सुनिता विनोद कोळेकर (वय 24), विघ्नेश विनोद कोळेकर (वय 6), वैदवी विनोद कोळेकर (वय 3), अनुसया लक्ष्मण केळेकर (वय 50), सीमा सुनिल केळेकर (वय 23), रामचंद्र विठ्ठल केळेकर (वय 60), मंदा रामचंद्र कोळेकर (वय 55),उमा धोंडिबा कोळेकर (वय12), यांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे.

मुसळधार पावसाने मोरणा गुरेघर धरणाच्या पश्चिम दिशेला अवघ्या 9 उबंर्‍याचे खालचे आंबेघर हे गाव गुरूवारी रात्री 2 वाजण्याच्या सुमारास भूस्खलनाच्या ढिगार्‍याखाली गाडले गेले. चार कुटुंबातील 15 सदस्य व पाळीव जनावरे चिखलात गाडली गेल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. ही माहिती मिळताच शुक्रवारी सकाळपासून प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली.

मात्र आंबेघरला जाणारा रस्ता ओढ्याला आलेल्या पाण्याच्या प्रवाहामुळे ठिकठिकाणी वाहुन गेला आहे. त्यामुळे गावापासून दूर 5 किमी अंतरावरच बचावकार्यासाठी आलेली सर्व वाहने थांबली होती. पुढे तुटलेला रस्ता, ओढ्याचा प्रवाह, चिखल, चढणीचा मार्ग व पाऊल वाट यामुळे गावापर्यंत मदत पोहचली नाही. शुक्रवारी तहसीलदार योगेश टोम्पे, गटविकास अधिकारी मीना साळुंखे यांच्यासह स्थानिक प्रशासकीय अधिकार्‍यांच्या पथकाला गावापर्यंत पोचताना मोठी कसरत करावी लागली.

एनडीआरएफची टीम शनिवारी सकाळी घटनास्थळी पोहचल्यानंतर त्यांनी स्थानिक नागरिकांच्या सहाय्याने शोध मोहीम हाती घेतली. मात्र या शोधकार्यात अनेक अडथळे येत होते. त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात मातीचा ढिगारा साठल्याने तो बाजुला करताना अडचणी निर्माण होत होत्या. घमेले, खोरे, बादलीच्या साह्याने चिखल बाजुला करुन शोध मोहीम सुरू होती. मात्र, ढिगार्‍याखाली दगड, झाडे, चिखलाचा राडारोडा झाल्याने शोध पथकाला मोठी कसरत करावी लागत होती. शनिवारी दुपारपर्यंत दोन कुटुंबातील 11 व्यक्तींचे मृतदेह मिळून आले. आणखी 4 मृतदेह गाडल्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.

घटनेचा पंचनामा व सापडलेल्या मृतदेहांचे जाग्यावरच शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या उपस्थित त्यांच्यावर तेथेच अंत्यसंस्कार करण्यात आले. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी शनिवारी आंबेघरला भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. यावेळी मदत कार्यासाठी लागेल ते सहकार्य करण्याची प्रशासनाचीभूमिका असून तशा सूचना अधिकार्‍यांना केल्या. पालकमंत्री ना.बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री ना.शंभूराज देसाई व सत्यजितसिंह पाटणकर यांनी देखील आंबेघरला भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली.

Back to top button