कोयना धरण : दरवाजे साडेपाच फुटांवर स्थिर | पुढारी

कोयना धरण : दरवाजे साडेपाच फुटांवर स्थिर

पाटण : पुढारी वृत्तसेवा

कोयना धरणाचे दरवाजे शनिवारी बारा फुटांवरून दुपारपर्यंत साडेपाच फुटांपर्यंत कमी करण्यात आले आहेत . कोयना धरणांतर्गत विभागात पावसाचा जोर मंदावल्याने धरणात येणार्‍या पाण्याची आवक कमालीने घटली आहे.

सध्या धरणात प्रतिसेकंद सरासरी 50,934 क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे. धरणाचे सहा वक्री दरवाजे साडे पाच फुटांवर स्थिर ठेवून त्यातून प्रतिसेकंद 28,140 क्युसेक्स व पायथा विजगृहातून वीजनिर्मिती करून 2100 क्युसेक्स असे प्रतिसेकंद एकूण 30,240 क्युसेक्स पाणी पूर्वेकडे कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे.

धरणात एकूण 87.45 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणातून मोठ्या प्रमाणावर सोडण्यात आलेले पाणी कमी करण्यात आले आहे. त्याचवेळी पूर्वेकडे पावसाने उघडीप दिल्याने नदीकाठच्या गावात, लोकवस्तीत घुसलेले पाणी मोठ्या प्रमाणावर कमी झाल्याने स्थानिकांना दिलासा मिळाला आहे .

धरणात सध्या सरासरी प्रतिसेकंद 50,934 क्युसेक्स पाण्याची आवक लक्षात घेता व धरणातील सध्याचा उपलब्ध पाणीसाठा व आगामी काळात पाणी साठवून घेण्याची क्षमता लक्षात घेता धरणाचे दरवाजे बारा फुटांवरून नंतर दहा ,आठ व त्यानंतर ते साडेपाच फुटांपर्यंत खाली आणण्यात आले.

यामुळे पूर्वेकडे कमी प्रमाणात पाणी सोडण्यात येत असल्याने व त्या -त्या विभागातील पावसाचा जोर ओसरल्याने स्थानिक कोयनेसह अन्य नद्या ,ओढ्यांच्या पाणी पातळीत झालेली धोकादायक वाढ आता कमी झाली आहे. पाटण शहरासह नदीकाठच्या गावात, घरात बाजारपेठा व दुकानात घुसलेले पाणी आता कमी झाले आहे.

पाण्याखाली गेलेले महत्त्वाचे पूल आता हळूहळू रहदारीसाठी पूर्वपदावर येत आहेत.कोयना धरणाची सध्याची स्थिती पाहता एकूण पाणीसाठा 87.45 टीएमसी. त्यापैकी उपयुक्त पाणीसाठा 82.33 टीएमसी. पाणीउंची 2149.6 फूट, जलपातळी 655.168 मीटर इतकी झाली आहे.

शुक्रवारी संध्याकाळी पाच ते शनिवारी सायंकाळी पाच या चोवीस तासातील व एक जूनपासून आत्तापर्यंतचा एकूण पाऊस कंसात मि.मी. मध्ये पुढील प्रमाणे कोयना 111 (2707), नवजा 108 (3535), महाबळेश्वर 226 ( 3434) पावसाची नोंद झाली आहे.

Back to top button