‘मराठी भाषा गौरव दिवस’ जोरदार साजरा करण्याचे राज ठाकरेंचे आवाहन

‘मराठी भाषा गौरव दिवस’ जोरदार साजरा करण्याचे राज ठाकरेंचे आवाहन
Published on
Updated on

मुंबई, पुढारी ऑनलाईन : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिऱ्यांना 'मराठी भाषा गौरव दिवस' जोरदारपणे साजरा करण्याचे आवाहन केले आहे. यानिमित्त राज्यभरात विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून आपल्या परिसरातील वातावरण मराठीमय करण्याचंदेखील आवाहन राज ठाकरे यांनी केलेलं आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सोशल मीडियाच्या अधिकृत अकांऊट्सवरून 'मराठी भाषा गौरव दिवस' साजरा करण्यासंदर्भात एक पत्रक जारी केलेलं आहे. त्या पत्रात राज ठाकरे म्हणताहेत की, "२७ फेब्रुवारी हा मराठीतील थोर कवी कुसुमाग्रज ह्यांचा जन्मदिवस. हा दिवस आपण महाराष्ट्रात 'मराठी भाषा गौरव दिवस' म्हणून साजरा करतो. 'गौरव दिवस' पूर्वीही दिनदर्शिकेत किंवा कॅलेंडरमध्ये हा दिवस होता; परंतु तो दिवस धूमधडाक्यात साजरा करण्याची पद्धत आपण, आपल्या पक्षाने सर्वप्रथम महाराष्ट्रात सुरू केली."

"हा आपल्या भाषेचा 'गौरव' दिवस आहे, तो त्याच जोशात, त्याच दिमाखात आपल्या शहरात, गावात, प्रत्येक भागात, प्रत्येक प्रभागात, प्रत्येक विभागात जोरात साजरा व्हायला हवा. आपली भाषा आहे म्हणून आपण आहोत. आपली भाषा आपल्या सर्वांना ओळख देते. त्यामुळेच आपल्या एका महान, गौरवशाली परंपरा असलेल्या मराठी भाषेचा गौरव त्याच जोरदारपणे साजरा झाला पाहिजे.", असं मनसेने सांगितलं आहे.

"लक्षात ठेवा की, मराठी भाषकांनी या देशाच्या फार मोठ्या भागावर आपलं राज्य एकेकाळी प्रस्थापित केलं होतं. या भाषेचा वचक संपूर्ण देशात होता. ज्या भाषेनं कित्येक मोठे साहित्यिक, विचारवंत, समाजसुधारक दिले. त्या भाषेचा 'गौरव' दिवस आहे हा. संत ज्ञानेश्वरांपासून, संत तुकाराम, चोखामेळा, गोरोबा कुंभार अशी संत मंडळी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले ह्यांच्यासारखी द्रष्टी माणसं, स्वातंत्र्यवीर सावरकर, हुतात्मा राजगुरूंसारखे क्रांतीकारक, शाहीर अमर शेख, शाहीर अण्णाभाऊ साठे ह्यांच्यासारखे समाजाला जागं ठेवणारे, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, गाडगे महाराज, लोकमान्य टिळक, कर्मवीर भाऊराव पाटील, अशी किती किती नावं घ्यायची? पण, या सर्वा-सर्वांची भाषा मराठी आणि अर्थात सर्वांत महत्त्वाचे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचीही भाषा मराठीच!", अशीही माहिती मनसेने आपल्या पत्रकात लिहिली आहे.

पत्रकात पुढे म्हटलं आहे की, "…अशा या मराठी भाषेचा जयजयकार त्याच जोमानं, त्याच उत्तुंगतेनं व्हायला हवा. यासाठी विविध प्रकारचे कार्यक्रम तुम्हाला आयोजित करता येतील. ते इतक्या जोरदारपणे साजरे करा की, तुमच्या भागातल्या प्रत्येक माणसाला कळलं पाहिजे की आज 'मराठी भाषा गौरव दिवस' आहे. त्यात जास्तीत जास्त लोक सहभागी होतील हे पहा. तो जेवढा भव्य करता येईल तितका तो करा. त्यात मराठी भाषेचं पावित्र्य राखा. संपूर्ण राज्यात या दिवसाच्या निमित्तानं मराठीमय वातावरण करा. तुम्हा सर्वांना शुभेच्छा!"

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news