घरदार तर जळालंच पण मनेही होरपळली; एका रात्रीत झालं होत्याचं नव्हतं | पुढारी

घरदार तर जळालंच पण मनेही होरपळली; एका रात्रीत झालं होत्याचं नव्हतं

कण्हेर : बाळू मोरे
बुधवारी मध्यरात्री शॉर्टसर्किटने अचानक लागलेल्या कोंडवेतील गाडे वाड्यातील भीषण आगीने चार घरांचे होत्याचे नव्हते झाले. घरदार तर जळालंच पण या कुटुंबियांची मनेही होरपळली आहेत. आगीने यामधील एका कुटुंबाचं तर सारं काही गमावलं आहे. अन्न, वस्त्र व निवाराही हिरावून नेला. आता सावरायचं कसं अन् जगायचं तरी कसं? या विवंचनेने ही कुटुंबं हादरुन गेली आहेत. संसारोपयोगी साहित्य जळाल्याने काबाडकष्ट करणार्‍या शेतकर्‍यांचे अवसान गळालं आहे.

दत्तात्रय गाडे, नितीन गाडे, रवींद्र गाडे व संतोष गवळी यांच्या कुटुंबासाठी ही रात्र म्हणजे अक्षरशः काळरात्र बनून आली. कोंडवे (ता.सातारा) येथील गाडे कुटुंबियांची मोठी भावकी आहे. गाडे कुटुंबियांचा पुरातन काळातील लाकडाचा मोठा वाडा आहे. या वाड्यात भावकीतील अनेक लहान- थोर मंडळी खेळली बागडली आहेत. कुटुंब वाढत गेले तसतसे अनेकजण आपल्या नोकरीनिमित्त उदरनिर्वाहासाठी गावात इतरत्र स्थायिक झाले. परंतु सामान्य शेतकरी या वाड्यात आज देखील प्रतिकूल परिस्थितीत वास्तव्य करत आहे. परंतु याच काबाडकष्ट करणार्‍या कुटुंबावर काळाने घाला घातला. हे कुटुंब उघड्यावर पडून सारं काही गमावून बसलेले आहेत.

दरम्यान, नशीब बलवत्तर म्हणून झोपेत असतानादेखील भीषण आगीतही माणूस जीवाच्या आकांताने बाहेर आला. या भयावह आगीने बाकी काही शिल्लकच ठेवलं नव्हतं. आगीत घरे खाक झाल्याने यातील गरीब कुटुंबं उघड्यावर आली. आगीने अन्न, वस्त्र व निवाराही हिरावून नेला. त्यामुळे यातील सामान्य कुटुंबाचे जगणे अवघड झाले आहे. या कुटुंबाचे मोठे नुकसान झाल्याने त्यांचे अश्रू अनावर झाले आहेत. सारं कुटुंब उघड्यावर आल्याने हादरून गेले आहे. हतबल झालेल्या या नुकसानग्रस्त कुटुंबाला आगीच्या एका घटनेने उद्ध्वस्त करून टाकले आहे.

सर्वसामान्य व अल्पभूधारक असलेल्या शेतकरी कुटुंबातील दत्तात्रय गाडे हे शहरात एका संस्थेमध्ये वॉचमन म्हणून काम करून आपला उदरनिर्वाह करत आहेत. मुलीच्या लग्नाचं ओझं डोक्यावर असल्याने मिळालेल्या पैशातून एकेक वस्तू जुळवून त्यांनी घरात ठेवलेल्या होत्या. परंतु भीषण आगीत त्याची राखरांगोळी झाली असून लेकीच्या लग्नाचे मोठे संकट त्यांच्यावर आता ओढवले आहे.

भरपाई किती मिळणारं अन् केव्हा मिळणार?

गाढ झोप लागत असतानाच अचानक आगीने घाला घालून सर्वकाही हिरावून नेलं आहे. मुलीचं लग्न तर दूरच, मात्र घरही नसल्याने या कुटुंबांचं जगणं अवघड झाल आहे. या कुटुंबाला आता भरपाई किती मिळणारं अन् केव्हा मिळणार? हा खरा प्रश्‍न आहे.

हेही पाहा : विश्वाच्या उत्पत्तीचे रहस्य टाइम ट्रॅव्हल मधून उलघडणार ? | James Webb Space Telescope | NASA

Back to top button