डॉ. प्रतापसिंह जाधव यांना स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार जाहीर | पुढारी

डॉ. प्रतापसिंह जाधव यांना स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार जाहीर

कराड : पुढारी वृत्तसेवा

दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांना स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार जाहीर झाला आहे. उंडाळे (ता. कराड) येथील स्वातंत्र्यसेनानी दादा उंडाळकर स्मारक समितीने सोमवारी या पुरस्काराची घोषणा केली. 51 हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर यांच्या 48 व्या स्मृतिदिनानिमित्त स्वातंत्र्य संग्राम सैनिक अधिवेशन आणि माजी सैनिक मेळावा शुक्रवार, दि. 18 फेब्रुवारी रोजी उंडाळे (ता. कराड) येथे होत आहे. अधिवेशनात यावर्षीचा प्रतिष्ठेचा स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे, अशी माहिती दादा उंडाळकर स्मारक समितीचे विश्वस्त आणि रयत साखर कारखान्याचे चेअरमन अ‍ॅड. उदयसिंह पाटील, व्यवस्थापकीय विश्वस्त प्रा. गणपतराव कणसे, प्रा. धनाजी काटकर, कराड तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन रंगराव थोरात यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

याआधी ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी श्रीमती उषा मेहता, गोविंदभाई श्रॉफ, सामाजिक कार्यकर्ते मोहन धारिया, श्रीमती निर्मलाताई देशपांडे, प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. वसंतराव गोवारीकर, सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे, न्यायमूर्ती पी. बी. सावंत, लेखक आणि विचारवंत सदानंद मोरे, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग, डॉ. प्रकाश आमटे यांच्यासह महाराष्ट्राच्या सामाजिक जडणघडणीत मोलाचे योगदान देणार्‍या व्यक्तींना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी पत्रकारितेबरोबरच सामाजिक क्षेत्रातही राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाचे योगदान दिले आहे. परखड आणि सडेतोड लिखाणातून त्यांनी पत्रकारितेत स्वतंत्र मानदंड स्थापित केला आहे. ‘पुढारी’च्या माध्यमातून त्यांनी अनेक सार्वजनिक प्रश्नांना वाचा फोडली. अन्यायपीडितांना न्याय मिळवून दिला.

1974 मध्ये त्यांनी पुढाकार घेऊन छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक त्रिशतसंवत्सरी आणि राजर्षी शाहू छत्रपती महाराज जन्मशताब्दी हे लोकसोहळे यशस्वी केले. शिवाजी विद्यापीठात ललित कला विभाग उभारण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. जोतिबा तीर्थक्षेत्र विकास निधीचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी या तीर्थक्षेत्राचा कायापालट घडविला. श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकासासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले.

1999 मध्ये पाकिस्तानने कारगिलवर हल्ला केला. त्यावेळी डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी अडीच कोटींचा निधी उभारून सियाचीन या जगातील सर्वात उंच युद्धभूमीवर जवानांसाठी अत्याधुनिक हॉस्पिटलची उभारणी केली. ऐतिहासिक मराठा आरक्षणाचा लढा, कोल्हापूर खंडपीठ प्रश्न, ऊस दर प्रश्न, दूध दरवाढ आंदोलन, कोल्हापुरातील अन्यायकारक टोल विरोधी आंदोलन अशा विविध प्रश्नांमध्ये त्यांनी आघाडीवर राहून निर्णायक भूमिका बजावली.

1989 साली तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत दै. ‘पुढारी’चा सुवर्णमहोत्सव विराट जनसमुदायाच्या साक्षीने पार पडला होता. 1 जानेवारी 1999 रोजी दिवंगत गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या हस्ते दै. ‘पुढारी’चा हीरकमहोत्सव साजरा करण्यात आला. 3 जानेवारी 2015 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत दै. ‘पुढारी’चा अमृत महोत्सवी वर्धापन दिन साजरा झाला होता. रौप्यमहोत्सवासह ‘पुढारी’च्या चार महत्त्वाच्या सोहळ्यांचे आयोजन करणारे ते एकमेव संपादक आहेत.

सामाजिक बांधिलकी जपून राष्ट्रभक्तीने प्रेरित होऊन त्यांनी पत्रकारिता केली. त्याबद्दल राष्ट्रभक्तीपर पत्रकारितेसाठी दिला जाणारा ‘पांचजन्य’ हा प्रतिष्ठेचा राष्ट्रीय पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते आणि तत्कालीन उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांच्या अध्यक्षतेखाली संसद भवनात हा सोहळा झाला. ‘पद्मश्री’ हा नागरी सन्मान देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. अनेक पुरस्कारांनी त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.

Back to top button