सातारा : बेपत्ता पोलिस अधिकारी संग्राम ताटे बेशुध्द अवस्थेत सापडले | पुढारी

सातारा : बेपत्ता पोलिस अधिकारी संग्राम ताटे बेशुध्द अवस्थेत सापडले

सातारा; पुढारी वृत्तसेवा : जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे बेपत्ता असलेले पोलिस निरीक्षक संग्राम ताटे (मूळ रा. मारुल, ता.कराड, सातारा) हे अखेर १३ दिवसानंतर बेशुध्द अवस्थेत सापडले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिस अधिकारी गायब झाल्याने महाराष्ट्र पोलिस दल हादरुन गेला. या दरम्यान, शिरवळ येथे ताटे सापडले असल्याचे निकटवर्तीयांनी सांगितले आहे.

जालना एसीबीत ते कर्तव्य बजावत असताना त्यांना २० दिवसांपूर्वीच प्रमोशन मिळाले आहे. त्यानुसार त्यांची कोकणात बदली झाली होती. याच दरम्यान दि. ३ फेब्रुवारी रोजी ते जालना येथील घरात मोबाईल, वाहन, पाकीट, घड्याळ अशा वस्तू ठेवून घरातून बाहेर पडले होते. बराचवेळ झाल्यानंतर संग्राम ताटे हे परत न आल्याने त्यांच्या पत्नीने शोधाशोध केली. पती सापडत नसल्याने त्यांनी पोलिसांशी संपर्क केला. पोलिसांनी याबाबतची सर्व माहिती घेवून तपास करण्यास सुरूवात केली. परंतु, पोनि संग्राम ताटे यांचा ठावठिकाणा लागत नव्हता.

याच दरम्यान ताटे हे बेपत्ता असल्याची नोंद जालना पोलिस ठाण्यात झाली. पोलिस अधिकारी बेपत्ता झाल्याने महाराष्ट्र पोलिस दल त्यांच्या तपासाच्या कामाला लागले. गेल्या चार दिवसांपूर्वी ते सांगली शहरात फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तपासाची पराकाष्टा केली. मात्र, तरीही पोलिसांना ते सापडत नव्हते.

रविवारी (दि.१३) रोजी दुपारी सातारा जिल्ह्यातील शिरवळ येथे एक जण बेशुध्द अवस्थेत पडलेल्याचे परिसरातील एका व्यक्तीला दिसले. त्या व्यक्तीने संग्राम ताटे याच्या हातावर मोबाईल नंबर लिहिल्याचे निदर्शनास आले. या क्रमांकावर व्यक्तीने फोन केल्यावर संग्राम याच्या पत्नीने तो उचलला. संग्राम यांचे वर्णन सागताच तिने ओळखले.

यानंतर पत्नीने तात्काळ याची माहिती कराड येथील कुटुंबियांना दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोनि संग्राम ताटे असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना कराड येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असल्याचे पोनि संग्राम ताटे यांचे निकटवर्तीय शिवाजीराव इंगवले यांनी सांगितले आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button