सातारा : देवरूखवाडी वर दरड कोसळून दहा घरे गाडली | पुढारी

सातारा : देवरूखवाडी वर दरड कोसळून दहा घरे गाडली

सातारा / वाई; पुढारी वृत्तसेवा : सातारा मधील देवरूखवाडी वर दरड कोसळली. पावसाने जिल्ह्यात हाहाकार उडाला असून, वाई तालुक्यात गुरुवारी रात्री जांभळी खोर्‍यातील देवरूखवाडी वर दरड कोसळली. त्यामध्ये 20 घरांपैकी 10 घरे गाडली गेली असून, 10 जणांना रात्री उशिरापर्यंत बाहेर काढण्यात यश आले.

पाचजण बेपत्ता असून, रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध लागला नाही. बचाव कार्य वेगाने सुरू असून, प्रशासन देवरूखवाडी येथे वेगवान हालचाली करीत आहे. दरम्यान, जावली तालुक्यातील रेंगडीवाडीजवळ ओढ्याला आलेल्या पुरामध्ये चौघेजण वाहून गेले असून, रात्री उशिरापर्यंत त्यांची शोधाशोध सुरू होती. दरम्यान, कण्हेर, उरमोडी, तारळी धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे कृष्णा, वेण्णा, उरमोडी, कोयना नद्यांना महापूर आला असून, नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्याच्या पश्चिम भागात 35 कि.मी. अंतरावरील जांभळी खोर्‍यात कोंढावळे गावानजीक देवरूखवाडी ही छोटी वाडी असून, रात्री उशिरा या वाडीवर अख्खा डोंगर कोसळला. प्रचंड मोठे भूस्खलन झाल्याने जमिनीला भेगा पडून घरे गाडली गेली. रात्रीच्या अंधारात मोठा हाहाकार माजला. प्रचंड पडणारा पाऊस व कोसळलेला डोंगर यामुळे गरीब लोक हादरून गेले. जखमींनी व काही ग्रामस्थांनी आसपासच्या गावांमध्ये फोनाफोनी करून प्रशासनाला कळवण्यात आले. आ. मकरंद पाटील हे त्याच भागात होते. त्यांनी तातडीने तहसीलदार रणजित भोसले यांच्यासह पोलिस अधिकार्‍यांना घेऊन घटनास्थळ गाठले. सुमारे 10 जण ढिगार्‍याखालून बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले.

प्रचंड पडणारा पाऊस, धुके व आणखी भूस्खलनाचा धोका यामुळे प्रशासनापुढेही बचाव कार्यात अडथळे येत होते. मात्र, तरीही प्रशासनाने शिताफीने काही लोकांना बाहेर काढले. मात्र, बर्‍याच घरांमध्ये राहणार्‍यांचा संपर्क होत नसल्याची माहिती पान 2 वर जखमींनी यावेळी दिली. त्यामुळे प्रशासनही हादरून गेले आहे.

देवरूखवाडीतील कुटुंबातील कर्ते पुरूष मुंबईत कामधंद्यानिमित्त आहेत. मात्र, गावाकडच्या लोकांवर हे आस्मानी संकट कोसळले आहे. घटनास्थळाचे वातावरण भेदरलेले असून लगतच्या कुरुंडे भागातही भुस्खलन झाल्याचे वृत्त आहे. प्रशासनाने तिकडेही लक्ष दिले असून बचाव कार्य वेगाने सुरू आहे.

सातारा जिल्ह्यात पश्चिमेकडे पावसाचे आकांडतांडव सुरू असून हाहाकार उडाला आहे. अनेक ठिकाणी रस्ते व पूल खचल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. पश्चिम भागातील घाटरस्त्यावर दरडी कोसळल्या.

जिल्ह्यात मंगळवारी व बुधवारी पावसाने आकांडतांडव केल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले. बुधवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढला. गुरूवारी दिवसभरही अधूनमधून जोरदार सरी कोसळत होत्या. सातारा, महाबळेश्वर, वाई, जावली या तालुक्यात पावसाने मोठे नुकसान झाले आहे. महाबळेश्वरमध्ये आजपर्यंतचा सर्वाधिक पाऊस झाला आहे.

उरमोडी व कण्हेर धरणातून पाणी सोडण्यात आल्यामुळे कृष्णा नदीच्या पात्रात वाढ झाली आहे. सातार्‍याजवळ संगम माहुली येथे वेण्णा व कृष्णेच्या संगमावर महापूर आला असून लगतच्या कैलास स्मशानभूमीत पाणी घुसले आहे. स्मशानभूमीच्या खालील बाजूस असलेले 14 अग्निकुंड पाण्यात गेले. पाण्याची पातळी वाढत असून धोममधून पाणी सोडण्याचा निर्णय झाला तर कृष्णेची धोक्याची पातळी ओलांडली जाणार आहे. जिल्ह्यात गुरुवारी सकाळी 10 वाजेपर्यंत पडलेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे सातारा 100.6 मि.मी., जावली 140.2 मि.मी., पाटण 132.9 मि.मी., कराड 81.4 मि.मी., कोरेगाव 50.2 मि.मी., खटाव 37.3 मि.मी., माण 8.1 मि.मी., फलटण 4.7 मि.मी., खंडाळा 23.7 मि.मी.,वाई 112.4 मि.मी., महाबळेश्वर 198.3 मि.मी.पावसाची नोंद झाली.

रेंगडीवाडीत डोंगर सरकल्याने धोका

कुडाळ : रेंगडीवाडी येथे पुरात चौघेजण वाहून गेल्यानंतर या परिसरात थरकाप उडाला आहे. परिसर हा डोंगर खचला असून, मोठ्या प्रमाणात भूस्खलनही झाले आहे. रेंगडी फाटा ते रेंगडी गावठाणदरम्यान मुकवली, वाटंबे गावच्या पश्चिमेस व दक्षिणेस असलेल्या डोंगराचा मोठा भाग सुमारे 25 मीटर खाली सरकला आहे. आणखी 20 मीटर डोंगर खचण्याचा धोका भूवैज्ञानिकांनी अहवालात दिला आहे.

सातारा  जिल्ह्यात रेड अ‍ॅलर्ट

जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाने हाहाकार माजवला असून, धरणांतून पाणी सोडण्यात येऊ लागले आहे. अद्यापही पावसाचा जोर कायम असल्याने जिल्हा प्रशासनाने रेड अ‍ॅलर्ट जारी केला आहे. महसूल, पोलिस, जिल्हा परिषदेसह सर्व विभाग प्रमुखांच्या सुट्ट्या, रजा बंद करण्यात आल्या असून, सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. पूरपरिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी एनडीआरएफ पथकाला पाचारण करण्यात आले आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. त्यामुळे कृष्णा व कोयना नद्यांना पूर आला आहे.

नदीकाठच्या गावांतील काही कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. जिल्ह्यातील पाऊस आणि पूर परिस्थितीवर जिल्हाधिकारी शेखर सिंह आणि निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे बारकाईने लक्ष ठेवून आहेत. सर्व परिस्थिती नियंत्रणात असली तरी जिल्हा प्रशासन प्रतिबंधात्मक उपाययोजना करत आहे. जिल्हा प्रशासनाने दरडग्रस्त गावांचा सर्वे करुन धोकायदायक ठिकाणी उपाययोजना करण्याच्या सुचना पूर्वीच दिल्या आहेत. त्याचबरोबर पूरनियंत्रण रेषेवरील गावांचेही अहवाल सादर करण्यात आले असून प्रामुख्याने वाई, सातारा, कराड आणि पाटण या तालुक्यांतील गावांमधील संबंधित कुटुंबांना पूर्व सुचना देण्यात आल्या आहेत. बुधवारी रात्रीपासून पावसाचे प्रमाण वाढले. गुरुवारीही पावसाची संततधार सुरु होती. त्यामुळे धरणे भरु लागली. कोयना आणि कण्हेर धरणातून पाणी विसर्ग सुरु करण्यात आल्यामुळे नदीपात्रांतील पाणीपातळी वाढल्याने धोका निर्माण झाला आहे. बर्‍याच ठिकाणी रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेले आहेत. पाटण, कराड तालुक्यातील सखल भागात पूरपरिस्थिती निर्माण होवून जिवीत हानी होण्याची शक्यता असल्याने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुण्याहून एनडीआरएफचे पथक पाचारण केले आहे. हे पथक शुक्रवारी दाखल होण्याची शक्यता आहे.

पाऊस, पूरपरिस्थिती आणि या नैसर्गिक संकटात नागरिकांना तातडीने मदत उपलब्ध व्हावी, गैरसोय टाळता यावी यासाठी सर्व विभागाच्या प्रमुखांनी कार्यालयाच्या मुख्यालय ठिकाणी थांबावे, असे आदेश देण्यात आले आहेत. वरिष्ठ अधिकार्‍यांपासून कर्मचार्‍यांपर्यंत सर्वांच्या सुट्ट्या, रजा बंद करण्यात आल्या आहेत. आगामी चार-पाच दिवस पावसाची अशीच परिस्थिती राहू शकते. त्यामुळे जिल्ह्यात इमारतींची पडझड, पिकांची हानी तसेच जिवीत हानी होण्याची शक्यता असल्याने महसूल, कृषी तसेच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पंचनामे करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, पूराच्या पाण्यात जावू नये. पुलावरुन पाणी वाहत असताना पूल ओलांडू नये. धोकादायक इमारतीमध्ये आश्रय घेवू नये. दरडींचा धोका असल्यामुळे डोंगराळ भाग, घाटात थांबू नये, असे अवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Back to top button