महाबळेश्वर मध्ये ३६ तासांत रेकॉर्डब्रेक 32 इंच पाऊस | पुढारी

महाबळेश्वर मध्ये ३६ तासांत रेकॉर्डब्रेक 32 इंच पाऊस

महाबळेश्वर; पुढारी वृत्तसेवा : महाबळेश्वर शहर व परिसरात गेले दोन दिवस पावसाचे तुफान आले आहे. महाळेश्वरमध्ये 36 तासांत तब्बल 32 इंच इतका विक्रमी पाऊस झाला आहे.

या पावसामुळे शहरासह तालुक्यातील बहुतांश रस्ते जलमय झाले. दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढल्याने आणि घाटातील मोर्‍या वाहून गेल्याने अंबेनळी घाटातील वाहतूक बंद केली आहे. महाबळेश्वर-पाचगणी रस्त्यावर सर्वत्र पाणीच पाणी झाले. त्यामुळे वाहतूक कोंडी झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या. पिकांना जलसमाधी मिळाली असून, जनजीवन कोलमडले आहे.

कोकणचा घाटमाथा अशी ओळख असणार्‍या महाबळेश्वरमध्येही गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. महाबळेश्वरमध्ये गुरूवारी सकाळी 8.30 वाजेपर्यंतच्या 24 तासात विक्रमी 20 इंच पाऊस झाला तर गुरूवारी सकाळी 8.30 पासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत 12 इंच पावसाची नोंद झाली असून गेल्या 36 तासात 32 इंच पाऊस कोसळला आहे. हा पाऊस आजपर्यंतचा सर्वाधिक ठात्तस आहे.

मुसळधार पावसामुळे वेण्णा लेक पूर्ण भरला असून विसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे महाबळेश्वर-पाचगणी रस्त्यावर पाणीच पाणी झाले. रस्त्यावर आलेल्या पाण्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या पावसामुळे महाबळेश्वरचे आकर्षण असणारा लिंगमळा धबधबा फेसाळू लागला आहे. मोठया प्रमाणात पाऊस झाल्याने शेतीमधील पिकांना जलसमाधी मिळाली आहे. महाबळेश्वरपासून तापोळ्याला जाताना 1 किलोमीटर अंतरावर रस्ता खचला आहे. त्यामुळे येथील वाहतूक पर्यायी रस्त्याने वळवली आहे. तापोळा रस्त्यावर ठिकठिकाणी दरडी कोसळल्या आहेत.

या पावसामुळे अनेक पिके कुजण्याचा धोका निर्माण झाला आहे. तर शहरातील काही भागात घरे, हॉटेल व ढाब्यांमध्ये पाणी शिरल्याने नुकसान झाले. घाट रस्त्यावर दरडी व संरक्षक भिंतीही कोसळल्या होत्या. ग्रामीण भागालाही या पावसाचा मोठा फटका बसला आहे. ग्रामीण भागातही घरांमध्ये पाणी शिरले. तर अनेक वीज पुरवठा करणारे विद्युत पोल कोलमडून पडले होते. त्यामुळे दिवसभर वीज पुरवठा खंडीत झाला होता. त्यामुळे नागरिकांना अंधारातच दिवस काढावा लागला.

दरम्यान, महाबळेश्वर-प्रतापगड रस्त्यावरील धबधबे ओसंडून वाहत आहे. यामुळे घाट रस्त्यावर संपूर्ण पाणीच पाणी होते हा संपूर्ण रस्ताच धोकादायक झाला. गेल्या अनेक वर्षात घाट रस्त्यावर इतक्या मोठया प्रमाणात पाऊस झाला नसल्याचे जाणकारांनी सांगितले. या पावसामुळे घाट रस्त्यावर दगड व मातीमिश्रीत पाणी आल्याने रस्ता पूर्ण ब्लॉक झाला होता. मुसळधार पाऊस व रस्त्यातील अडथळ्यांमुळे वाहनधारकांनी आपली वाहने रस्त्याच्या कडेला लावली होती. या पावसामुळे मुख्य बाजारपेठेत सर्वत्र संचारबंदी सारखी परिस्थिती होती. या पावसातही हौशी पर्यटकांनी भिजण्याचा आनंद घेतला.

दरम्यान, तालुक्यातील नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना प्रांताधिकारी संगीता चौगुले यांनी बैठकीत दिल्या. यावेळी तहसिलदार सुषमा चौधरी, गटविकास अधिकारी नारायण घोलप, मुख्याधिकारी पल्लवी पाटील व अधिकारी उपस्थित होते. याचबरोबर ठिकठिकाणच्या नुकसानीचे स्वरुप व प्रकार कळवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तालुक्यातील विविध भागातील रस्त्यांची वाहतूक आवश्यक तिथे वळवण्यात यावी, असे आदेशही देण्यात आले आहे. तर पर्यटकांसह स्थानिक नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे पर्यटकांनी हॉटेल मधून बाहेर पडू नये असे आवाहन केले.

अंबेनळी घाट वाहतुकीसाठी बंद

प्रतापगड व कोकणात जाण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेला अंबेनळी (पोलादपूर) घाट गुरुवारी सायंकाळी वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. घाटामध्ये ठिकठिकाणी रस्ता खचला असून, मोर्‍या वाहून गेल्या आहेत. डोंगरावरून दरडी कोसळण्याचे प्रकार सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर बांधकाम विभागाने हा घाट बंद केला. तालुक्याच्या ग्रामीण भागातील दळण-वळण यंत्रणाही बंद पडली आहे. पावसामुळे तालुक्यातील चतुरबेट व उचाट हे पूल पाण्याखाली गेले आहेत. पुलावरून पाण्याचा मोठा प्रवाह जात असल्याने या दळण-वळणासाठी पुलावर अवलंबून असणार्‍या 28 गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत.

Back to top button