सातारा मध्ये 17 लाखांचा गुटखा जप्‍त | पुढारी

सातारा मध्ये 17 लाखांचा गुटखा जप्‍त

सातारा ; पुढारी वृत्तसेवा : सातारा शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पथकाने (डीबी) गुटखा वाहतूक करणार्‍या टोळीचा पर्दाफाश करत दोघांना अटक केली. या कारवाईत पोलिसांनी तब्बल 17 लाख रुपये किमतीचा गुटखा व वाहन असा 27 लाखांचा मुद्देमाल जप्‍त केला आहे. दरम्यान, गुटखा माफीयांवरील कारवाईने खळबळ उडाली आहे.

शंकर केरू केदार (वय 38, रा. चिंपोली, ता. सिन्‍नर जि. नाशिक) व सुभाष हरीभाऊ घुगे (वय 63, रा. धनकवडी, पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, दि. 30 रोजी रात्री ही कारवाई करण्यात आली आहे. सातारा पोलिसांना गुटखा वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार डीबीच्या पथकाने सातारा एमआयडीसी परिसरात सापळा लावला.

पोलिसांना पुणे पासिंगचा टेम्पो संशयास्पदरीत्या आळल्यानंतर त्यांनी वाहन चालकाकडे जावून चौकशी केली असता त्याने गुरांचा खाण्याचा भुसा व चिरमुरे असल्याचे सांगितले. मात्र, पोलिसांना टेम्पोमधून उग्र वास येत असल्याने त्यांनी खातरजमा केली असता त्यांना गुटखा असल्याचे निदर्शनास आले.

पोलिसांनी वाहन थांबवून पाहणी केली असता गुटख्याची तब्बल 38 पोती असल्याचे समोर आले. पोलिसांनी टेम्पोतील दोघांना खाली उतरवून त्यांना ताब्यात घेतले. बाजारभावाप्रमाणे गुटख्याची किंमत 17 लाख रुपये झाली. याशिवाय प्रतिबंधित केलेला गुटखा वाहतूक करणारा टेम्पो पोलिसांनी जप्‍त केला. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर मुद्देमाल पोलिस ठाण्यात आणण्यात आला. अशाप्रकारे 27 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्‍त केला.

पोलिस दोघा संशयितांकडे कसून चौकशी करत आहेत. टेम्पो मालक कोण? गुटखा कुठून कुठे घेवून निघाले होते? त्याचा मूळ मालक कोण? असे अनेक सवाल उपस्थित झाले आहेत. डीबीचे फौजदार समीर कदम, पोलिस हवालदार सुजीत भोसले, अविनाश चव्हाण, ज्योतीराम पवार, पंकज ढाणे, अभय साबळे, गणेश घाडगे, संतोष कचरे, गणेश भोंग, सचिन देवकर यांनी कारवाईत सहभाग घेतला.

Back to top button