सातारा : लॉकडाऊनने प्रेमात अडथळा अन् प्रेयसीने प्रियकर बदलला ! चिडलेल्या पहिल्या प्रियकराने.. | पुढारी

सातारा : लॉकडाऊनने प्रेमात अडथळा अन् प्रेयसीने प्रियकर बदलला ! चिडलेल्या पहिल्या प्रियकराने..

सातारा, पुढारी वृत्तसेवा

कोरोना संसर्गामुळे अनेकांचे खाण्याचे वांदे तर कित्येकांचे उद्योग बसले असताना याच कोरोनाचा इफेक्ट सातार्‍यातील एका प्रेमवीरावर वेगळाच झाल्याचे ‘रेकॉर्डवर’ आले आहे. लॉकडाऊनमुळे त्या काळात प्रियकर भेटायला येत नसल्याने प्रेयसीने हिरोच बदलल्याचे समोर आले. अचानक ब्रेकअप झाल्याने चवताळलेल्या प्रियकराने मग आकांडतांडव केला. यातूनच हाणामारी, पळवापळवी अन् जायबंदी होण्याची घटना घडल्याने भलताच ‘ट्विस्ट’ समोर आला आहे.

प्रेमा तुझा रंग निराळा याची अनुभुती अनेक घटनांमधून समोर येत असते. पूर्वी नुसते एकमेकांकडे पाहणं झालं अगदी त्यानंतर चिठ्ठ्या देण्या-घेण्याच झालं तरी जग ठेंगणे व्हायचे. आता मात्र फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपने प्रेमाचा बेरंग केला असल्याचे वास्तव समोर येत आहे.

सातार्‍यातील अशीच घटना समोर आली आहे. या कहाणीमध्ये युवक व युवती यांच्या प्रेमाची सुरुवात साधारण तीन वर्षांपासून झालेली आहे. तो फलटण तालुक्यातील तर ती सातारची. ती कॉलेजला तो मात्र कमी शिकलेला पण कामावर जात असलेला. आठवड्यातून तो किमान दोनवेळा तरी तिला भेटायला हमखास सातार्‍याला येत असे. प्रेमाच्या आणाभाका घेत कॅफे, हॉटेल करत अनेकदा यवतेश्वर घाट, कासची देखील सफर केली. लग्नाची स्वप्ने पाहून पुढे कसे जायचे अशा चर्चाही त्यांच्या झडल्या. वर्ष-सव्वावर्ष गेल्यानंतर मात्र अचानक कोरोना आला.

कोरोनामुळे लॉकडाऊनचा मामला झाल्याने या दोघांच्या भेटीगाठीवर मर्यादा आल्या. सुरुवातीला कोणालाच अंदाज नसल्याने कोरोनाची ब्याद जाईल व आपण पुन्हा भेटू या आशेवर 5 ते 6 महिने गेले. लॉकडाऊनमुळे प्रेमवीराचा कामधंदा गेल्याने त्याच्यावर अस्मानी संकट कोसळले. त्यातच प्रेयसीला भेटता येत नाही याचे शल्य त्याला खायला उटत होते. अशात फोनचा मोठा दुवा होता. मात्र प्रेयसीने अनेक कारणे सांगत फोनवरील संपर्क कमी करत ती फोन, मेसेज टाळू लागली. यामुळे प्रेमवीर व्हायबल झाला.

6, 8 महिन्यानंतर प्रेयसी पहिल्यासारखं बोलत नाही, मेसेज करत नसल्याची शंका आल्याने त्याने वाद घातला. यावर प्रेयसीने हिसका दाखवत त्याची लायकी काढली. फोनवरील शब्दांच्या या फटकार्‍याने प्रेमवीर घायाळ झाला. लॉकडाऊनमध्येही शक्य होईल तसे भेटण्याचा प्रयत्न केला. वादविवादानंतर दोन-तीन भेटीही दोघांमध्ये झाल्या. मात्र योग्य पॅचअप झालेले नव्हते.

चौथ्या भेटीमध्ये मात्र तिने थेट ‘ब्रेकअप’चा पवित्रा घेतला. याचवेळी प्रेमवीराला मारहाण झाली. ही मारहाण करणारा तो युवक दुसरा कोणी नव्हता तर त्याच्या प्रेयसीचा मित्रच होता. यातूनच मग प्रेमवीराला गेल्या सहा महिन्यातील कमी बोलण्याचे नेमके कारण उमगले. यातूनही प्रेमवीराने हार न मानत प्रेयसीला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रेयसी काही केल्या पॅचअपला तयार होत नव्हती.

यातूनच प्रियकराने तिला भेटायला बोलावून तिला दुचाकीवरुन पळवले. या गडबडीत मात्र ती प्रेयसी जायबंदी झाली आणि प्रकरण पोलिस ठाण्यात गेलं. पोलिसांनी जाबजबाब घेतल्यानंतर त्यांनाही नेमक्या ‘ट्विस्ट’चा अंदाज लक्षात आला. अखेर या प्रकरणात गुन्हा दाखल होवून प्रेमवीरावर कायदेशीर कारवाई करण्यात आली.

हेही वाचा

Back to top button