

कोल्हापूर ; अनिल देशमुख : जिल्ह्यात मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते योजनेतून 24 रस्ते होणार आहेत. 20 कि.मी. लांबीच्या या रस्त्यांच्या आराखड्याला राज्य शासनाने मान्यता दिली आहे. यासह राज्यातील 23 जिल्ह्यांतील 1 हजार 368 कि.मी.च्या रस्त्यांचा आराखडा मंजूर केला आहे.
राज्य शासनाने गावातील शेत रस्ते तसेच पाणंद रस्ते करण्यासाठी पालकमंत्री शेत/पाणंद रस्ते योजना सुरू केली होती. मात्र, या योजनेतही अनेक अडचणी येत होत्या, त्यात निधीचीही कमरता होती. यामुळे ही योजना अधिक कार्यक्षम आणि सुटसुटीत करून तिचे रूपांतर 'मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते' असे करण्यात आले आहे. मनरेगा आणि राज्य रोहयो यामधून ही योजना राबविली जाणार आहे.
या योजनेसाठी ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद अशा स्तरावरून राज्य शासनाने प्रस्ताव मागवले होते. राज्यातील काही जिल्ह्यांचे प्रस्ताव दाखल झाले होते. लोकप्रतिनिधींची मागणी, निधीची उपलब्धता आणि यावर्षाचा उर्वरित कालावधी या सर्वांचा विचार करून राज्य शासनाने 23 जिल्ह्यांतील 1 हजार 368.4 कि.मी.च्या एकूण 1 हजार 384 रस्त्यांच्या आराखड्याला मान्यता देण्यात आली.
औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वाधिक 304, तर वाशीम जिल्ह्यातील सर्वात कमी 2 रस्त्यांचा यामध्ये समावेश आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण 24 रस्त्यांचे एकूण 20 कि.मी.चे काम पूर्ण केले जाणार आहे. यामध्ये शाहूवाडी तालुक्यातील सर्वाधिक 12 रस्त्यांचा समावेश आहे. यासह भुदरगड तालुक्यातील 8 रस्त्यांचा आणि राधानगरी व हातणंगले तालुक्यातील प्रत्येक दोन रस्ते या योजनेंतर्गत केले जाणार आहेत.
रस्ते गावनकाशावर असायला हवेत
मातोश्री ग्रामसमृद्धी या योजनेंतर्गत होणारे रस्ते हे गावनकाशावर असणे आवश्यक आहे. संबंधित रस्त्याबाबत ग्रामसभेत ठराव झाल्याची खात्री करावी, याकरिता कोणतेही भूसंपादन केले जाणार नाही. या रस्त्याद्वारे कोणत्याही प्रकारे अतिक्रमण होणार नाही तसेच न्यायालयीन आदेश असतील तर त्याची खात्री करावी, अशा सूचनाही राज्य शासनाने यंत्रणेला दिल्या आहेत.