जावली : खिरखंडी गावात शिक्षणासाठी मुलींचा जीवघेणा संघर्ष | पुढारी

जावली : खिरखंडी गावात शिक्षणासाठी मुलींचा जीवघेणा संघर्ष

निलेश शिंदे : पुढारी वृत्तेसवा : दुर्गम आणि डोंगराळ जावली तालुक्यातील कोयना धरणाच्या शिवसागर जलाशय किनारी वसलेले खिरखंडी हे गाव. गावात जेमतेम पाचे ते सहा घरे. गावात राहणाऱ्या लोकांची संख्या जेमतेम पंधरा ते वीस. या ठिकाणी सातारा जिल्हा परिषदेची पहिली ते पाचवीपर्यंतची शाळा आहे. मात्र, पुढील शिक्षणाची गावात सोय नसल्याने या गावातील मुली पाचवीपासून पुढील शिक्षणासाठी जीवघेणा प्रवास करून शिक्षण घेत असल्याचे पहायला मिळत आहे.

खिरखंडी हे गाव कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयाच्या पलिकडे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प गाभा क्षेत्रात येते. येथील काही लोकांचे पुनर्वसन झाले, तर काही लोक आजही गावात राहात आहेत. गावात पाचवीपासून पुढील शिक्षणाची सोय नसल्याने या गावातील मुली स्वतः होडीचे सारथ्य करत अर्धा तास होडी व्हलवत खिरखंडी ते विनायकनगर शेंबडी मठ, असा नित्याचाच प्रवास करत आहे.

सुरक्षिततेचे कोणतेही साधन सोबत नाही, वादळ-वारे-पाऊस याची कोणत्याही प्रकारची तमा न बाळगता या मुली बारमाही होडी चालवत प्रवास करून शाळेत ये-जा करीत असतात. शेंबडी मठ या ठिकाणी होडीतून उतरून नंतर यांचा पायी प्रवास सुरु होतो घनदाट जंगलातून चार ते पाच किलोमीटर पायी प्रवास करत फळणीमार्गे या मुली-मुले येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत शिक्षणाचे धडे घेण्यासाठी येत असतात.

पायी प्रवास करत असताना घनदाट जंगलातून ये जा करीत असताना जंगली प्राणी, सर्प यांना न भीता या मुली या जंगलातून ये-जा करीत असतात. असा हा जीवघेणा प्रवास आणि शिक्षण घेण्यासाठीचा नित्यक्रम त्यांचा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र शासनाने याकडे पुर्णपणे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.

एकीकडे शासन ‘बेटी बढाओ, बेटी पढाओ’ यासारख्या घोषणा आणि योजना मुलींसाठी राबवित असते. मात्र, दुसरीकडे हे विदारक चित्र पहायला मिळत आहे. एकीकडी देश स्वातंत्र्याचा ७३ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना दुसरीकडे आजही खेड्यातील मुलींचा शिक्षणसाठीचा हा जीवघेणा संघर्ष आजही सुरूच आहे.

कोयना धरणाचा अथांग शिवसागर जलाशय कोणत्याही सुरक्षितते विना पार करीत मैलोन मैलाची पायपीट करीत शिक्षणाचे धडे घेणाऱ्या सावित्रीच्या लेकी सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्याच्या खेडोपाड्यात आजही कायम आहेत. आता तरी शासनाने या मुलींकडे पाहून यांच्या शिक्षणाची जीवघेणी संघर्षमय कहाणी आता तरी थांबवावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

Back to top button