सातार्‍यात विवाहितेचा जाचहाट करून खून | पुढारी

सातार्‍यात विवाहितेचा जाचहाट करून खून

सातारा ; पुढारी वृत्तसेवा : सातारा शहर उपनगरातील संगमनगर येथील विवाहिता सुजाता शंकर भोळे (वय 24) हिचा छळ करून तिला बेदम मारहाण झाल्याने त्यात तिचा मृत्यू झाल्याचा आरोप माहेरच्या मंडळींनी केल्यानंतर सासरच्या लोकांविरुद्ध हुंडाबळी, खून यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातारा सिव्हिल व पोलिस सहकार्य करत नसल्याने विवाहितेच्या कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यासमोरच शुक्रवारी रात्री ठिय्या मांडल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, शवविच्छेदन पुणे येथे झाले असून त्या अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे.

पती शंकर काळूराम भोळे, सासू लीलाबाई काळूराम भोळे, दीर राजेंद्र काळूराम भोळे, जाऊ स्वाती राजेंद्र भोळे (सर्व रा.संगमनगर, सातारा) या संशयित आरोपींवर खुनासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये सुजाता शंकर भोळे (वय 24, रा.संगमनगर, सातारा) असे मृत्यू झालेल्या विवाहितेचे नाव आहे. दरम्यान, सुजाताचे चुलते अतुल दत्तात्रय धुमाळ (वय 48, रा.घोरपडे पेठ, पुणे) यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. सुजाताला आई व वडील नाहीत. तिचा लहानपणापासून चुलत्यांनीच सांभाळ केला आहे.

तक्रारीत म्हटले आहे की, संशयित आरोपी शंकर व सुजाता यांचा 2016 मध्ये विवाह झाला आहे. संशयित शंकर भोळे याची लॅब आहे. विवाह झाल्यानंतर दीड वर्षांनी त्यांना मुलगी झाली. मुलगी झाल्यामुळे भोळे कुटुंबिय नाराज झाले व त्यांनी सुजाताचा छळ करण्यास सुरुवात केली. याचदरम्यान पती शंकर भोळे याला लॅबसाठी व कार घेण्यासाठी सासरच्या मंडळींनी सुजाताला माहेरहून 5 लाख रुपये आणण्यासाठी त्रास देण्यास सुरुवात केली. दिवसेंदिवस सासरचे लोक त्रास देवू लागल्याने सुजाताने ही बाब माहेरी व तिच्या मैत्रिणीला सांगितली.

विवाहितेला वारंवार त्रास देवू लागल्याने माहेरच्या कुटुंबियांनी सुजाताला पुणे येथे सोडले. यावेळी माहेरच्या मंडळींनी बैठक घेवून बोलणी झाल्यानंतर पुन्हा सुजाताला नांदवण्यासाठी सातार्‍यात सोडले. तरीही अधूनमधून सुजाताला सासरचे लोक त्रास देतच होते. दि. 20 जानेवारी 2022 रोजी पहाटे पती शंकर भोळे याने तक्रारदार यांना फोन केला.

त्यावरुन अशी माहिती दिली की, सुजाताला उलट्यांचा त्रास होत असल्याने उपचारासाठी सातारा सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. पहाटे हा फोन झाल्यानंतर सकाळी 9 वाजता शंकर याने पुन्हा तक्रारदार यांना फोन करुन सांगितले की सुजाताची तब्येत खालावली असून तुम्ही सातारला या, असे सांगितले.

मुलीच्या तब्येतीबाबत फोन झाल्याने पुण्यावरुन माहेरचे लोक सातारला निघाले. तोपर्यंत सुजाताचा मृत्यू झाला असल्याचे माहेरच्या लोकांना समजल्यानंतर त्यांना धक्‍का बसला. माहेरच्या नातेवाईकांनी सातारा सिव्हीलमध्ये येवून मृतदेहाची पाहणी केली असता सुजाताच्या अंगावर मारहाणीचे व्रण दिसले.

यामुळे सुजाताचा सासरच्या लोकांनी घातपात केल्याचा संशय त्यांना आला व त्यांनी तसा आरोप केला. यामुळे सिव्हीलमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांना याबाबतची माहिती दिल्यानंतर त्यांनीही सहकार्य केले नाही. तोपर्यंत सुजाताचे नातेवाईक सिव्हीलमध्ये जमले. पोलिस गुन्हा दाखल करुन घेत नसल्याने माहेरचे कुटुंबिय आक्रमक बनले.

घडलेल्या घटनेवरुन अखेर माहेरच्या मंडळींनी शुक्रवारी रात्री शहर पोलिस ठाणे गाठले व त्यांनी शहर पोलिस ठाण्यासमोरच गारठ्यात ठिय्या मांडला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे पोलिस गांगरुन गेले. जमलेल्या लोकांनी सुजाता भोळे हिचा खून झाला असून त्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन संशयितांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी केली. या सर्व घटनेमुळे पोलिस ठाण्यासमोर तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस बंदोबस्त वाढवला. सुमारे 1 तास पोलिस ठाण्यासमोर गोंधळ सुरु होता.

अखेर मध्यरात्री पोलिस ठाण्यात हुंडाबळी, खुनासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर शवविच्छेदन पुणे येथे करणार असल्याचा पवित्रा कुटुंबियांनी घेतल्यानंतर त्यानुसार मृतदेह पुणे येथे नेण्यात आला. शवविच्छेदन झाल्यानंतर पुणे येथेच सुजाता भोळे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अद्याप पुणे येथे झालेल्या शवविच्छेदनाचा अहवाल आला नसल्याने मृत्यूचे नेमके कारण समोर आलेले नाही.

दरम्यान, शनिवार दुपारपर्यंत याप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी कोणालाही ताब्यात घेतले नव्हते. यामुळे शनिवारी दुपारी पुन्हा संगमनगर येथील संशयित आरोपींच्या घरासमोर व पोलिस चौकीसमोर सुजाता भोळे यांच्या नातेवाईकांनी धाव घेतल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

संशयिताच्या घरावर नातेवाईकांचा मोर्चा

सुजाता भोळे हिच्या मृत्यूप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. शहर पोलिसांनी शंकर भोळे यांना ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे. अन्य तिघांचा शोध सुरू आहे. या प्रकरणात शनिवारी सकाळी सुजाता भोळे यांच्या नातेवाईकांनी त्यांचा पती शंकर भोळे याच्या घरावर मोर्चा काढला. या घटनेची पोलिसांनी व वैद्यकीय अधिकार्‍यांनी योग्य ती माहिती न दिल्याने सुजाता यांना पुण्याला न्यावे लागले. यामध्ये पोलिसांनी सहकार्य केले नसल्याचा आरोपही नातेवाईकांनी केला.

Back to top button