सातारा : अतिवृष्टीग्रस्तांना मिळणार 50 लाखांची मदत

सातारा : अतिवृष्टीग्रस्तांना मिळणार 50 लाखांची मदत
Published on
Updated on

सातारा; पुढारी वृत्तसेवा :  जिल्ह्याच्या पश्‍चिमेस जुलै व ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत जावली, वाई, महाबळेश्‍वरसह कोरेगाव तालुक्यातील शेतीचे नुकसान झाले. संबंधित बाधित 1 हजार 95 शेतकर्‍यांना सुमारे 50 लाखांची नुकसान भरपाई मिळणार आहे. राज्य शासनाकडून निधी उपलब्ध होताच कृषी विभागाकडून तातडीने मदत निधीचे वाटप केले जाणार आहे.

जिल्ह्यात यावर्षी जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले. 28 आणि 29 जुलै रोजी जावली आणि वाई तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने सोयाबीन व भात शेतीचे मोठे नुकसान झाले. जावली तालुक्यात 133 शेतकर्‍यांचे 20 हेक्टर, तर वाई तालुक्यात 282 शेतकर्‍यांचे 40 हेक्टरवरील सोयाबीन व भात पीक नष्ट झाले. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात कोरेगाव तालुक्यातील 309 शेतकर्‍यांच्या 96.60 हेक्टरवरील वाघा घेवडा (राजमा) तसेच सोयाबीन पिकाला फटका बसला. याशिवाय जावली तालुक्यात 74 शेतकर्‍यांची 3.71 हेक्टर, वाई तालुक्यातील 298 शेतकर्‍यांची 17.89 हेक्टर व महाबळेश्‍वर तालुक्यातील 27 हेक्टर शेतजमीन पावसाच्या पाण्याच्या प्रवाहामुळे खरवडून गेली असून काही ठिकाणी वाहून आलेला गाळ साचला आहे.

अतिवृष्टीमुळे चारही तालुक्यात शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. याबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका कृषी अधिकारी तसेच कृषी सहाय्यकांनी पंचनामे करून अहवाल सादर केले. राज्य शासनाकडून संबंधित शेतकर्‍यांना लवकरच मदत दिली जाणार आहे. दि. 17 व 18 ऑगस्ट रोजी पुन्हा महाबळेश्‍वर तालुक्यात 7 हेक्टर तसेच वाई तालुक्यातील 25 हेक्टर शेतीचे पावसामुळे नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे सुरु असून हे कामकाज अंतिम टप्प्यात आहे.
जिल्हा अधीक्षक विजयकुमार राऊत यांच्याकडून फॉलोअप घेण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात जावली, वाई, महाबळेश्‍वर व कोरेगाव या तालुक्यांत अतिवृष्टीमुळे 723 शेतकर्‍यांच्या 156.53 हेक्टर शेती पिकाचे तर पुरामुळे जमीन खरवडून गेल्याने व गाळ साचल्याने 372 शेतकर्‍यांच्या 21.6 हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे.

अतिवृष्टीने 1 हजार 95 शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. दुसर्‍या टप्प्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे अहवाल राज्य शासनाला सादर करण्यात येणार आहे. नुकसानीप्रमाणे भरपाईची मागणीही कळवली जाणार आहे. ही मदत सुमारे 50 लाखापर्यंत होऊ शकते.
निधी प्राप्‍त झाल्यानंतर लगेचच बाधित शेतकर्‍यांना आर्थिक मदत दिली जाणार आहे.

नुकसान भरपाई रक्‍कमेत दुप्पट वाढ

शेती व्यवसाय हा निसर्गावरच अवलंबून आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा शेतकर्‍यांना फटका बसत असतो. शेतकर्‍यांना जास्तीत जास्त मदत मिळण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. पूर्वी सर्व पिकांसाठी 2 हेक्टर असणारी मर्यादा वाढवून ती 3 हेक्टर करण्यात आली आहे. यापुढे जिरायत पिकांसाठी असलेली 6 हजार 800 रुपयांची मर्यादा वाढवून ती 13 हजार 600 रुपये, बागायत पिकांसाठी असलेली 13 हजार 500 रुपयांची मर्यादा वाढवून 27 हजार करण्यात आली आहे. फळपिकांसाठी 18 हजार रुपये मिळणारी नुकसान भरपाई रक्‍कम 36 हजार रुपये दिली जाणार आहे. या निर्णयामुळे सतत संकटात सापडणार्‍या बळीराजाला दिलासा मिळणार आहे.

अतिवृष्टीमुळे बाधित शेतकर्‍यांना दिलासा मिळावा यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील आहे. 15 ऑगस्टपर्यंत पावसामुळे नुकसान झालेल्या शेती पंचनाम्याचे काम पूर्ण झाले असून त्याचा अहवाल सादर केला आहे. उर्वरित पंचनाम्यांचे काम प्रगतीपथावर आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती नुकसान भरपाईपासून कुणी वंचित राहू नये यासाठी बाधित शेतकर्‍यांनी कृषी सहायक, तालुका कृषी अधिकार्‍यांशी संपर्क साधावा.
– विजयकुमार राऊत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सातारा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news