सातारकरांनो, का विसरलात छत्रपती प्रतापसिंहराजेंचा प्रताप?

सातारकरांनो, का विसरलात छत्रपती प्रतापसिंहराजेंचा प्रताप?
Published on
Updated on
सातारा;  हरिष पाटणे :

सातार्‍यालगतचा महादरे तलाव कुणी बांधला किती सातारकरांना माहीत आहे? यवतेश्वरच्या मंदिरामागे तलाव बांधून त्यातील पाणी खापरी नळाने सातारा शहरात कुणी आणले? किती जणांना माहिती आहे? सातार्‍याचा ऐतिहासिक राजवाडा, अदालतवाडा कुणी बांधला कितीजण सांगू शकतात? मराठा मुला-मुलींना ब्रिटीश काळात लष्करी शिक्षण देण्याची क्रांतीकारी व्यवस्था कोणी केली? हे कुणाला माहीत आहे का? जो छळ छत्रपती संभाजीराजेंचा औरंगजेबाने केला. तसाच छळ आणखी एका छत्रपतींचा ब्रिटीशांनी केला त्या थोरल्या प्रतापसिंहराजेंचा भिमप्रताप सातारकरांनो कसा काय विसरलात? जयंतीदिनी दोन हारांपुरतेच प्रतापसिंह महाराजांचे स्मरण शिल्लक राहिले आहे का?

सन 1707 मध्ये छत्रपती संभाजीराजेंचे सुपुत्र थोरले छत्रपती शाहूमहाराज हे सातारच्या गादीवर बसले आणि सातारा ही छत्रपतींची राजधानी झाली. सातार्‍यातल्या अनेक पेठा त्यांनी वसवल्या. प्रजाहितदक्ष राजा ही ओळख निर्माण करुन शाहूमहाराजांनी आपली किर्ती दिगंतात पसरवली. सातार्‍याला ऐतिहासिक शाहूनगरी म्हणतात ते याच छत्रपती शाहूंमुळे! सन 1750 पर्यंत त्यांनी राज्यकारभार पाहिला. शाहूमहाराज निपुत्रिक मरण पावले. त्यांच्या दुसर्‍या राणीने रामराजे यांना दत्तक घेतले. छत्रपती शाहू महाराजांच्या अंतिम काळातच पेशवाईचा उदय झाला. रामराजे व तिथून पुढच्या छत्रपतींच्या कालावधीत पेशवाईचा विस्तार झाला. सन 1750 ते 1818 या कालावधीत सुमारे 68 वर्षे पेशवे हेच सरकार होते व मराठेशाहीचे खरे मालक असलेले छत्रपती त्या काळात नामधारी होते असे इतिहास संशोधकांनी अनेक ठिकाणी लिहून ठेवले आहे. छत्रपती रामराजेंनाही मुलगा नसल्याने त्यांनीही वावीकर भोसले घराण्यातील विठोजीराजे यांना दत्तक घेतले व त्यांचे नाव बदलून दुसरे शाहूमहाराज असे ठेवण्यात आले. या दुसर्‍या शाहूमहाराजांचे व आनंदीबाईंचे चिरंजीव म्हणजे अजिंक्यतारा किल्ल्यावर 18 जानेवारी 1793 या दिवशी जन्मलेले, अदालतवाडा, सातार्‍याचा ऐतिहासिक राजवाडा, जलमंदिर बांधणारे थोरले छत्रपती प्रतापसिंहराजे भोसले. मात्र या थोरल्या छत्रपती प्रतापसिंहराजेंचा इतिहास थोरल्या छत्रपती शाहूमहाराजांप्रमाणेच दुर्लक्षित ठेवला गेला. त्यामुळे सातारकर जसे थोरल्या छत्रपती शाहूमहाराजांविषयी अनभिज्ञ आहेत तसेच छ़त्रपती प्रतापसिंहराजे भोसले यांच्याविषयीही सातारकरांना पराक्रमाचा इतिहास फारसा ठाऊक नाही. बुधवारी याच पराक्रमी छत्रपती प्रतापसिंहराजेंची जयंती असूनही गोलबागेतील पुतळ्यावर दोन हार घालण्यापलिकडे जयंती सोहळ्याचा कोणताही अधिकृत कार्यक्रम झाला नाही.

छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवारीच्या खणखणाटावर निर्माण केलेले लोककल्याणकारी स्वराज्य अखेरच्या काळापर्यंत ब्रिटीशांशी टक्कर देत टिकवून ठेवणारे छत्रपती म्हणून प्रतापसिंहराजेंचा गौरव करावा लागेल. दुसर्‍या शाहू महाराजांच्या अकाली मृत्यूनंतर वयाच्या पंधराव्या वर्षी (सन 1808) प्रतापसिंहराजे सातारच्या गादीवर बसले.

इतिहासाचे अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांच्या मते छत्रपती प्रतापसिंह महाराजांच्या शिक्षणावर दुसर्‍या बाजीराव पेशव्याने बंदी घातली होती. राजवाड्याभोवती गुप्तहेर नेमण्यात आले होते. या कालावधीत थोरल्या प्रतापसिंहराजेंना मातोश्री आनंदीबाईंनी मध्यरात्री कोणालाही कल्पना न देता स्वत: शिकवून उच्च शिक्षित व सुसंस्कृत बनवले. छत्रपती प्रतापसिंहराजेंच्या इतिहासाचा धांडोळा घेतल्यानंतर या लोककल्याणकारी राजाने सातारा शहरासाठी जे काही करुन ठेवले आहे तो इतिहास थक्क करणारा आहे. सातारा शहरातील ऐतिहासिक राजवाडा देशभर ओळखला जातो. ज्या प्रतापसिंह हायस्कूलमध्ये घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिकले ती राजवाड्याची इमारत बांधली ती थोरल्या प्रतापसिंहराजेंनीच. आताच्या राजमाता छत्रपती कल्पनाराजे भोसले व छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांचे निवासस्थान असलेले जलमंदिर आज देश-विदेशातील इतिहासकारांचे आकर्षणस्थळ ठरले आहे. मात्र त्याची निर्मिती केली ती याच थोरल्या छत्रपती प्रतापसिंहराजेंनी. ज्या अदालतवाड्यात आताच्या राजांचे ऐतिहासिक मनोमिलन झाले होते तो अदालतवाडाही थोरल्या प्रतापसिंह महाराजांनीच बांधला. एवढेच नाही ब्रिटिशांचा अंमल असताना, पेशवाईची करडी नजर असताना मुलींसाठी सैनिकी प्रशिक्षण देणारी शाळा सातार्‍यात सुरु केली तीही याच प्रतापसिंहराजेंनी. स्वत:ची कन्या गजराबाई हिलाही त्यांनी याच शाळेत सैनिकी शिक्षण दिले. मराठी, इंग्रजी आणि संस्कृतची पाठशाळा सुरु करुन प्रतापसिंहराजेंनी त्या काळात पुरोगामी विचार रुजवला. स्वत: विद्याव्यासंगी असलेल्या प्रतापसिंहराजेंनी सातारा शहरात पहिला छापखाना सुरु केला.

सातारा शहराला पाणी पुरवठ्याची समस्या होती तेव्हा यवतेश्वराच्या मंदिराच्या मागे त्यांनी तलाव बांधला. यवतेश्वर डोंगरावरुन खापरी नळीने त्यांनी सातारा शहरात पाणी आणले. एका अर्थाने प्रागतिक विचाराचे ते पहिले जलनायक होते. इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांच्या मते दुसरे बाजीराव व थोरले प्रतापसिंह महाराज यांच्यात कमालीचे वितुष्ट होते. पदोपदी प्रतापसिंह महाराजांचा उपमर्द केला गेला. वासोटा किल्ल्यावर छत्रपती प्रतापसिंह महाराज व त्यांच्या परिवाराला नजरकैदेत ठेवण्यात आले होते. चतुरसिंग भोसले यांनी या कारस्थानाविरोधात बंड पुकारले आणि पेशव्यांविरोधात लढाई आरंभली. मात्र, भोसले यांचे हे बंड पेशव्यांच्या सेनापतींनी मोडून काढले आणि चतुरसिंग भोसले यांना कैद करुन त्यांना ठार मारण्यात आले. इंग्रजांचा गर्व्हनर जनरल एलफिस्टन, स्मिथ, स्टोस्तन यांनी कोरेगाव भीमा, खडकी व अष्टी येथील युद्धात पेशव्यांचा पराभव केला. एलफिस्टननेच प्रतापसिंह महाराजांना पुन्हा गादीवर आणून राज्यकारभारात सहकार्य केल्याचे दाखले इतिहासात मिळतात. सन 1818 ते 1822 या कालावधीत ग्रॅण्ड डफ हा सातार्‍याचा रेसिडंट होता. याच डफने मराठेशाहीचा वैभवशाली इतिहास लिहिला. त्याच्या त्या लेखनात प्रतापसिंह महाराजांचा फार मोठा वाटा राहिला आहे. आज ग्रॅण्ड डफ याच्या संशोधनात्मक लेखनातील अनेक संदर्भ प्रतापसिंहराजेंच्या भीमप्रतापाची साक्ष देतात.

महाबळेश्वरच्या सृष्टीसौंदर्याची आज जगाला भुरळ पडते. मात्र, इंग्रजांना महाबळेश्वर पहिल्यांदा दाखवले ते छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी. इंग्रज अधिकारी भारतीय हवामानाशी जुळवून घेताना आजारी पडायचे. त्यांना थंड हवेच्या ठिकाणी जाण्याची ओढ असायची. जावळी खोर्‍यात असलेल्या पुरातन महाबळेश्वर क्षेत्राचा उल्लेख प्रतापसिंह महाराजांनी कर्नल लॉडविक याच्याजवळ केला होता. सन 1824 साली लॉडविकने या भागाची पाहणी केली. त्यानुसार सन 1826 मध्ये जनरल ब्रिग्ज याने महाबळेश्वर येथे जावून एक कुटी उभारली. पुढे छत्रपती प्रतापसिंह महाराजांनीच इंग्रजांना सातारा ते महाबळेश्वर असा रस्ता बांधून दिला अलिकडे त्याला राजमार्ग म्हटले जाते. या रस्त्यामुळे महाबळेश्वरला जाणारी वर्दळ वाढली. हाच रस्ता वाढवून प्रतापसिंह महाराजांनी तो प्रतापगडपर्यंत नेला. त्यामुळे कोकणात उतरणे सोयीचे झाले.

मुंबईचा गर्व्हर्नर सर जॉन माल्कम याने महाबळेश्वरात सैनिकांसाठी रुग्णालय बांधले. याच माल्कमच्या स्मरणार्थ प्रतापसिंह महाराजांनी महाबळेश्वर येथे माल्कम पेठ वसवली. माल्कमने या पेठेला छत्रपती प्रतापसिंह महाराजांचेच नाव द्यावे असे त्यावेळी सुचवले होते. मात्र, छ़त्रपतींनी त्याला नकार दिला. अलिकडच्या काळात हीच माल्कमपेठ सुप्रसिद्ध गिरीस्थान महाबळेश्वर म्हणून जगभर प्रसिद्ध आहे.
सन 1929 मध्ये इंग्रजांशी झालेल्या एका करारात माल्कम याने गिरीस्थान महाबळेश्वरची जागा छत्रपतींकडून घेतली आणि त्या मोबदल्यात छत्रपती शिवाजी महाराजांची कुलस्वामीनी असलेल्या भवानी मातेच्या मंदिराचा आणि प्रतापगडावरचा ताबा सातारच्या छत्रपतींकडे देण्यात आला. जगप्रसिद्ध महाबळेश्वरात आज इंग्रज अधिकार्‍यांच्या नावाने कितीतरी पॉईंटस् आहेत. मात्र, ज्यांनी इंग्रजांना महाबळेश्वर दाखवले त्या प्रतापसिंह महाराजांचे मात्र नामोनिशाण असलेले स्मारक कुठेही महाबळेश्वरात दिसत नाही हाही देवदुर्विलास!

नंतरच्या काळात इंग्रजांशी प्रतापसिंह महाराजांचे खटके उडू लागले. स्वाभिमानी प्रतापसिंह महाराज इंग्रजांना बाणेदारपणे उत्तरे देत होते आणि इंग्रज मात्र त्यांना कह्यात ठेवण्याचा प्रयत्न ते करत होते. शेवटी इंग्रजांनी त्यांना पकडून साखळदंडाने बांधून सातारच्या राजवाड्याबाहेर काढले. लिंब येथील गुरांच्या गोठ्यात त्यांना स्थानबद्ध करण्यात आले. पुढे त्यांना काशी येथे नेण्यात आले. त्यावेळी रंगो बापोजी गुप्ते यांनी प्रतापसिंह महाराजांच्या बाजूने इंग्रजांपुढे कैफियत मांडली. मात्र, मी राज्याची हाव कधीच धरली नाही. त्यामुळे राज्य जाईल अशी धमकी कशाला देता, असे प्रतापसिंह महाराजांनी इंग्रजांना ठणकावून सांगितले. पुढे 14 ऑक्टोबर 1847 या दिवशी प्रतापसिंह महाराजांचे तिकडेच निधन झाले.

एवढा भीमप्रतापी राजा सातार्‍यात होवून गेला. छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा, थोरल्या छत्रपती शाहूंचा लढावू, प्रागतिक विचाराचा वारसा खर्‍या अर्थाने सांभाळून छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी सातार्‍याचे नाव जगभरात पोहोचवले. मात्र, त्याच प्रतापसिंह महाराजांच्या कार्याविषयी दस्तुरखुद्द सातारकर अनभिज्ञ आहेत. 18 जानेवारी ही त्यांची जयंती असताना गोलबागेतील त्यांच्या पुतळ्याला दोन हार घालण्यापलिकडे सातार्‍यात कोणताही कार्यक्रम झाला नाही. ही एका पराक्रमी राजाची अवहेलनाच नव्हे का? इतिहासाचे अभ्यासक श्रीमंत कोकाटे, चंद्रकांत पाटील अशी मंडळी प्रतापसिंह महाराजांच्या इतिहासावर प्रकाशझोत टाकण्याचे काम संशोधनाच्या पातळीवर करत आहेत. मात्र, या शहराचा विस्तार ज्यांनी केला, ऐतिहासिक इमारती ज्यांनी उभ्या केल्या, पाणी पुरवठ्याची सोय ज्यांनी केली, बहुजन समाजाच्या शिक्षणाची दारे ज्यांनी उघडली, लष्करी शिक्षणाची सोय ज्यांनी केली त्या प्रतापसिंहराजेंना वंदन करुन त्यांचा ज्वलंत इतिहास नव्या पिढीला जागृतपणे सांगण्याची जबाबदारी सातारकर का विसरत आहेत?

गोलबागेसमोरचा प्रतापसिंह महाराजांचा पुतळा बदला

युद्धशास्त्रात राजाने तलवार मांडीवर आडवी ठेवली तर राजा शरण गेला असा अर्थ होतो. गोलबागेतील पुतळाही तलवार मांडीवर असलेला आहे. एकीकडे प्रतापसिंह महाराजांनी आधी पेशव्यांशी व नंतर इंग्रजांशीही टक्कर दिली. स्वाभीमानाची लढाई केली. त्यामुळे उद्याच्या महाराष्ट्रापुढे प्रतापसिंह महाराजांची स्वाभीमानाची ओळख ठेवायची असेल तर गोलबागेसमोरील पुतळ्यात बदल करावा व हे काम छत्रपती उदयनराजे भोेसले यांनी हातात घ्यावे, अशी भूमिका इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांची आहे. तसाच आग्रह तमाम सातारकरांचाही आहे. छत्रपती उदयनराजे भोसले याबाबतीत तातडीने पावले उचलतील, अशी अपेक्षा आहे. छत्रपती प्रतापसिंहराजेंच्या अधिकृत छायाचित्राबाबतही संशोधन सुरु आहे. वरील छायाचित्र गुगलवर रंगो बापोजी गुप्ते यांचे असल्याचे दाखवले गेले आहे. मात्र इतिहास अभ्यासक चंद्रकांत पाटील यांच्या मते ते छायाचित्र छत्रपती प्रतापसिंह महाराजांचेच आहे. महाराजांच्या निधनानंतर लंडनमध्येही हेच छायाचित्र प्रसिध्द करण्यात आले होते. त्यामुळे छत्रपती प्रतापसिंह महाराजांचे अधिकृत छायाचित्र महाराष्ट्रासमोर येणे गरजेचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news