

तासगाव : पुढारी वृत्तसेवा : शहरातील भाजपमधील एक माजी नगराध्यक्ष व माजी पंचायत समिती सदस्य यांनी बेदाणा व्यापारी याला नगरपालिका आवारात बेदम मारहाण करण्याचा प्रकार घडला. दरम्यान, या प्रकारानंतर शहरातील काशीपुरा गल्ली येथे शंभरहून अधिक तरुणांचा जमाव जमल्याने काहीकाळ तणावाचे वातावरण तयार झाले होते. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
याबाबत घटनास्थळवरुन मिळालेली अधिक माहिती अशी, भाजपचे माजी नगराध्यक्ष व माजी पंचायत समिती सदस्य पालिकेमध्ये काही कारणानिमित्त आले होते. पालिकेच्या दारात ते उभे असतानाच काशीपुरा येथील एका बेदाणा व्यापारी त्याठिकाणी आले. यावेळी माजी नगराध्यक्ष व संबंधित व्यापारी यांच्यात नजरानजर झाली. या दोघांत आगामी पालिका निवडणुकीच्या कारणावरून गेल्या काही दिवसापासून बाचाबाची सुरू असल्याचे समजते. त्यातूनच पालिकेत एकमेकांना लाखोंळी वाहून अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला. यावेळी माजी नगराध्यक्ष व माजी पंचायत समिती सदस्य यांनी त्या व्यापार्याला बेदम मारहाण केल्याची चर्चा पालिका आवारात उशिरापर्यंत सुरू होती.
दोन्ही गटाला पोलिसांच्या नोटिसा
घटनेनंतर पोलिस ठाण्यात दोन्ही गटातील प्रमुखांना बोलावून तक्रार दाखल करा, अन्यथा मिटवून घेण्याच्या सूचना पोलिस अधिकार्यांनी सबंधितांना केल्या. याबाबत पोलिस निरीक्षक सोमनाथ वाघ म्हणाले, तासगाव शहरात मंगळवारी झालेला प्रकार गंभीर आहे. एवढ्या मोठ्या संख्येने दोन्ही गटातील तरुण एकत्र आल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो. यामुळे दोन्ही गटातील संबंधितांना नोटीस देण्यात आली आहे. हा प्रकार पुन्हा घडल्यास दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात येईल.