चला पर्यटनाला : धार्मिक, ऐतिहासिक ठिकाण; ‘श्रीक्षेत्र मल्लिकार्जुन’

चला पर्यटनाला : धार्मिक, ऐतिहासिक ठिकाण; ‘श्रीक्षेत्र मल्लिकार्जुन’
Published on
Updated on

इस्लामपूर; मारुती पाटील :  गर्दी, गोंगाटापासून दूर असलेले, निसर्गरम्य डोंगर रांगांत व घनदाट वनराईत वसलेले येडेनिपाणी (ता. वाळवा) येथील पुरातन श्री मल्लिकार्जुन देवस्थान क्षेत्र भाविक व पर्यटकांना भुरळ घालत आहे. या क्षेत्राला पर्यटनस्थळाचा दर्जा मिळाल्याने येथे अनेक सुविधा निर्माण होऊ लागल्या आहेत. त्यामुळे येथे येणार्‍या भाविक, पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे.

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गापासून पूर्वेला चार किलोमीटरवर हे ठिकाण आहे. पूर्व-पश्चिम असलेल्या सुमारे दहा किलोमीटर लांबीच्या डोंगर रांगेत देवस्थान वसले आहे. या पर्वताला लिंग पर्वत असेही नाव आहे. अगस्ती ऋषींनी हे तीर्थक्षेत्र वसवल्याचा व पत्नी लोपामुद्रासह ते या ठिकाणी वास्तव्यास असल्याचा उल्लेख पुरातन ग्रंथांमध्ये आढळतो. दक्षिण काशी म्हणूनही काही ठिकाणी या देवस्थानचा उल्लेख आहे. तर वरी मल्लिकार्जुनाचे स्थान जाणा ॥ युगानयुगी हेममय ॥ असा श्री काशी खंडात या देवस्थानचा उल्लेख आहे.

किल्ले विलासगड उल्लेख…

16 व्या शतकात या ठिकाणाचा छत्रपती शिवाजी महाराजांनी टेहळणीसाठी वापर केला होता. त्यामुळे या ठिकाणाला 'किल्ले विलासगड' असेही संबोधले जाते. डोंगराच्या माथ्यावर व महादेव मंदिरावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील भुयारी कोठारे, तट भिंत, यादवकालिन गुहा, टेहळणी बुरूज, नगारखाना याचे अवशेष आजही पहायला मिळतात. शिवाय या परिसरातील एकमेव विष्णू मंदिरही याच परिसरात आहे. पाण्याचा तलाव, विस्तीर्ण घोडे मैदान या ठिकाणी आहे. हे ठिकाण हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीकही आहे. या ठिकाणी बावरदिन यांची समाधी, दर्गा व विठ्ठल मंदिर एकाच ठिकाणी आहे. या दर्ग्याची पूजा पुजारी करतो हेही या ठिकाणाचे खास वैशिष्ट्य आहे.

निसर्गरम्य ठिकाण…

हे ठिकाण डोंगर माथ्यावर वसले आहे. येथून दक्षिणेला वारणा नदीचा तर उत्तरेला कृष्णा नदी खोर्‍याचा विस्तीर्ण परिसर दिसतो. पूर्वेस संतोष गिरी ठिकाणही पाहण्यासारखे आहे. समुद्रसपाटीपासून 815 मीटर उंचीवर असलेल्या या पर्वताला हेम पर्वत, गिरी पर्वत या नावानेही ओळखले जाते. या ठिकाणाला पर्यटन क्षेत्राचा 'क' दर्जा मिळाला आहे. त्यामुळे येथे अनेक सुविधा उपलब्ध आहेत. शिवाय देवस्थान ट्रस्टमार्फतही लोकवर्गणीतून भाविकांसाठी सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. हा डोंगर वनविभागाच्या ताब्यात असल्याने येथे वनीकरण करण्यात आलेली झाडे चांगलीच वाढीस लागली आहेत. त्यामुळे परिसर वनराईने नटला आहे. त्याची भुरळ पर्यटकांना पडते.

धार्मिक, ऐतिहासिक महत्त्व असलेले ठिकाण आता खगोलप्रेमींसाठीही कुतूहलाचा विषय बनले आहे. कारण या डोंगरावर अनेक कोरीव शिल्पे सापडली आहेत. त्यातील काही शिल्पांचे गूढही उलगडलेले नाही. या ठिकाणाला अनेक संशोधकही भेट देत असतात.

पुरातन मंदिर…

महादेवाचे मंदिर डोंगराच्या मध्यभागी अखंड खडक खोदून बांधले आहे. ते अत्यंत पुरातन आहे. मंदिराच्या मध्यभागी महादेवाची पिंड आहे. मंदिराला कोरीव खांब आहेत. याच परिसरात सोमनाथ, उमाशंकर, भीमाशंकर यांची छोटी मंदिरे, मानकरी कट्टा, नागशिल्प, कोरीव दरवाजे, दीपमाळ, तिरका नंदी, तुळशी वृंदावन, हेमाडपंथी मंदिर पाहण्यासारखे आहे. पाताळगंगा व तीळगंगा हे दोन पाण्याचे टाकेही कायम पाण्याने भरलेली असतात.

कसे जाल…

या ठिकाणाकडे जाण्यासाठी पुणे-बेंगलोर महामार्गापासून येडेनिपाणीमार्गे डोंगराच्या पायथ्यापर्यंत पक्का डांबरी रस्ता आहे. शिवाय येलूर, मालेवाडी, गोटखिंडी या गावातून पायी वाटेनेही या डोंगरावर जाता येते. डोंगराच्या पायथ्यापासून मंदिरापर्यंत पायर्‍या आहेत. ठिकठिकाणी भाविकांच्या विश्रांतीसाठी निवारा शेड उभारण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news