

सांगली : पुढारी वृत्तसेवा
सांगली जिल्हा परिषदेचा 'स्मार्ट पीएचसी' हा उपक्रम राज्याला नवी दिशा देणारा आहे. त्यामुळे राज्यभर याच पद्धतीने उपक्रम राबविण्यासाठी सरकारला सूचना करणार आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केले. येथील कृष्णा मॅरेज हॉलमध्ये जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणार्या आरोग्य संजीवनी उपक्रमांतगर्त 'स्मार्ट पीएचसी' या उपक्रमाचा पवार यांच्याहस्ते शनिवारी प्रारंभ झाला. यावेळी ते बोलत होते.
पालकमंत्री जयंत पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार सुमन पाटील, आमदार अरुण लाड, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम, सातार्याच्या अतिरिक्त पोलिस अधीक्षक आंचल दलाल उपस्थित होत्या. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डुडी यांनी 'स्मार्ट पीएचसी' या उपक्रमाची माहिती दिली.
पवार म्हणाले, पूर्वी फॅमिली डॉक्टरांनी हातात हात घेतल्यानंतर पन्नास टक्के दुखणे कमी होत होते. मात्र आता खासगी रुग्णालयांत गेल्यानंतर स्पेशालिस्टकडे जाण्याचा सल्ला दिला जातो. त्याठिकाणी विविध तपासणी करण्यास सांगण्यात येतात. यासाठी मोठा खर्च होतो. पुढे किती तपासण्या कराव्या लागतील, याची खात्री नसते. आजाराची माहिती होणेही गरजेचे आहे. स्पेशालिस्टच्या नावाखाली होणार्या तपासणीबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.
ते म्हणाले, केंद्र आणि राज्य शासनाच्या आरोग्य यंत्रणेमुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळतो. जिल्हा परिषदेमार्फत ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केद्रांमध्ये दर्जेदार सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. याचा लोकांना फायदा होणार आहे. या उपक्रमांमुळे आरोग्य केंद्रांमधील सेवेचा दर्जा सुधाणार आहे. पवार म्हणाले, जिल्हा परिषदेमार्फत 'माझी शाळा आदर्श शाळा' उपक्रमातंर्गत जिल्ह्यात मॉडेल स्कूलचे होणारे काम कौतुकास्पद आहे. शाळा, वैद्यकीय आरोग्य केंद्र दर्जेदार होण्यासाठी शिक्षक, डॉक्टरांचे योगदान महत्वाचे आहे.
पालकमंत्री पाटील म्हणाले, गेल्या वर्षी प्रत्येक शाळेत जाऊन जातीचे दाखले देण्याची मोहीम राबविण्यात आली होती. यावेळी दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना जात पडताळणी दाखले शाळेतच देण्यात येणार आहेत.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. विवेक पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम, वैद्यकीय आरोग्य केंद्रांतील डॉक्टर, सरपंच, उपसरपंच उपस्थित होते.