

सांगली; पुढारी वृत्तसेवा : प्रशासनातील कोणतीही कामे अडणार नाहीत. सार्वजनिक सेवा गुणवत्तेच्या आणि सक्षमपणे राबवण्यात येतील. सर्वांना बरोबर घेऊन विकास कामांना गती देण्यात येईल, अशी माहिती नूतन जिल्हाधिकारी डॉ. दयानिधी राजा यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
दरम्यान, नूतन जिल्हाधिकारी म्हणून डॉ. दयानिधी यांनी मावळते जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडून पदभार स्वीकारला. जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ. दयानिधी यांचे सर्व विभागप्रमुखांनी स्वागत केले.
यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख-पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, उपजिल्हाधिकारी विजया पांगारकर, मोहिनी चव्हाण, अरविंद लाटकर, दीपक शिंदे, अजयकुमार नष्टे, उपविभागीय अधिकारी डॉ. संपत खिलारी, जोगेंद्र कट्यारे, जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल, जिल्हा नियोजन अधिकारी सरीता यादव आदि उपस्थित होते.
दरम्यान, पत्रकारांशी बोलताना मावळते जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले, गेल्या साडेतीन वर्षात जिल्ह्यात चांगल्या पद्धतीने काम करता आले. विशेषत: महापूर, कोरोना या काळात लोकांची चांगल्या पद्धतीने साथ मिळाली. राजकीय दबाव राहिला नाही.
लोकप्रतिनिधींच्याकडूनही चांगले सहकार्य मिळाले. सन 2019 आलेला महापूर आणि कोरोना संसर्गात पहिल्या लाटेत दहा दिवस खूप तणावाखाली गेले. मात्र यातून खूप काही शिकण्यास मिळाले. त्याचा उपयोग पुढे काम करताना नक्की होईल.
डॉ. चौधरी म्हणाले, जिल्ह्यात विविध विकासाच्या योजना राबवता आल्या. विशेषत: मॉडेल स्कूल, स्मार्ट पीएससी, अंगणवाडीमधील शिक्षण हे खूप चांगले आणि महत्वाचे उपक्रम हाती घेतले आहेत. त्यासाठी पुरेशा निधीची तरतूद केली आहे. जिल्ह्याच्या वाटचाल विकासाच्या दृष्टीने चांगल्या पद्धतीने सुरू आहे.