‘सांगली’वर कृपादृष्टी, रस्ते, निधीवरून खडाजंगी

‘सांगली’वर कृपादृष्टी, रस्ते, निधीवरून खडाजंगी
Published on
Updated on

सांगली : पुढारी वृत्तसेवा

मिरजेत रस्त्यांची चाळण झाली असताना सांगलीत एका रस्त्यासाठीच साठ-पासष्ठ कोटींचा प्रस्ताव केल्यावरून तसेच दयनीय रस्ते व मागासवर्गीय निधीची पळवापळव यावरून विशेष महासभेत खडाजंगी झाली. वादावादीचे प्रकारही घडले. विकासकामांमध्ये सांगलीवरच कृपादृष्टीच्या आरोपाचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी व आयुक्त नितीन कापडणीस यांनी खंडन केले.

'हर घर तिरंगा' या विषयावर बुधवारी महापालिकेत विशेष महासभा झाली. अध्यक्षस्थानी महापौर दिग्विजय सूर्यवंशी होते. आयुक्त नितीन कापडणीस, स्थायी समितीचे सभापती निरंजन आवटी, सभागृह नेते विनायक सिंहासने, विरोधी पक्षनेते संजय मेंढे तसेच नगरसेवक व अधिकारी उपस्थित होते.

सांगलीत राजर्षी शाहू महाराज मार्ग मॉडेल रस्त्यासाठी पासष्ठ कोटींचा प्रस्ताव केला. मिरज, कुपवाडमधील रस्त्याचा प्रस्ताव का केला नाही, मिरजेत रस्त्यांची चाळण झाली असताना केवळ सांगलीतीलच एका रस्त्यासाठी महापालिकेचा मोठा निधी का खर्च करताय? मिरज, कुपवाडवर अन्याय होत असल्याचा आरोप योगेंद्र थोरात यांनी केला. महापौर व त्यांच्यात वादावादीही झाली.

सांगली, मिरज, कुपवाड यांना समान निधी देण्याचा प्रयत्न केला जातो. कोणताही नवा प्रयोग, उपक्रम सांगलीत राबवून नंतर तो मिरज आणि कुपवाडमध्येही राबविला आहे. कोणत्याही शहरावर अन्याय करण्याचा प्रश्‍नच येत नाही. सांगलीच्या राजर्षी शाहू मार्गाबरोबरच मिरज आणि कुपवाडमधील रस्त्यांचाही प्रस्ताव सादर होईल, असे महापौर सूर्यवंशी यांनी सांगितले.

नगरसेवकनिहाय नव्हे, गरजेनुसार प्रायोरिटी

रस्त्यांची दयनीय अवस्था, पावसाळी मुरूम उपलब्ध न होणे यावरून विजय घाडगे, अनिता व्हनखंडे व सदस्यांनी प्रश्‍न उपस्थित केले. मुरुमीकरणाच्या 40 लाखांच्या कामांना मंगळवारी मंजुरी दिली आहे. आणखी 40 लाखांच्या कामांना मंजुरी दिली जाईल. नगरसेवकनिहाय मुरूम उपलब्ध न करता, गरजेच्या ठिकाणांनाच 'टॉप प्रायोरिटी' देऊन मुरूम उपलब्ध करून दिला जाईल. महापालिकेच्या चारही प्रभाग समितींमधील प्रत्येक 3 याप्रमाणे 12 रस्त्यांचे डांबरीकरण केले जाणार आहे, असे आयुक्त कापडणीस यांनी सांगितले.

शेतात अपार्टमेंट..!

महापालिकेच्या नगररचना विभागाने बांधकाम परवाना देताना काही नियमावली, आचारसंहिता ठरवावी. रस्ते, पाणी, ड्रेनेज कशाचीच सोय नसलेल्या ठिकाणी शेतात अपार्टमेंट बांधायला परवानगी कशी दिली जाते, असा प्रश्‍न इनामदार यांनी उपस्थित केला. महापालिका क्षेत्रात मोकाट कुत्री, घोडी, गाढवांचा सुळसुळाट झाला असल्याकडे प्रकाश ढंग यांनी लक्ष वेधले. कुत्री पकडण्याचा केवळ फार्स सुरू असल्याची टीकाही केली.

कुपवाड ड्रेनेज, गुंठेवारीतील विकास कामे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमचा विकास व अन्य कामांना निधीसाठी राज्य व केंद्र शासनाकडे पाठपुरावा करू, असे शेखर इनामदार यांनी सांगितले. महापालिकेचे सर्व पदाधिकारी व अधिकार्‍यांची स्वतंत्र बैठक घेऊन प्रस्ताव तयार करण्याचा निर्णय झाला. महापालिका बजेटमधील पाच टक्के मागासवर्गीय निधी खुल्या प्रवर्गात पळवला जात असल्यावरून जगन्नाथ ठोकळे, सुब्राव मद्रासी यांनी संताप व्यक्त केला. दरम्यान, आरक्षित प्रभागाव्यतिरिक्त भागातही मागासवर्गीय नागरिक रहात असलेल्या ठिकाणी मागासवर्गीय निधी खर्च करता येतो, असे स्पष्टीकरण प्रशासनाकडून झाले. एकही मागासवर्गीय व्यक्ती नसलेल्या भागात मागासवर्गीय निधी खर्च झाला असेल तर चौकशी केली जाईल, असे आयुक्त कापडणीस यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news