सांगलीत व्हेल माशाची उलटी जप्त

सांगलीत व्हेल माशाची उलटी जप्त
Published on
Updated on

सांगली; पुढारी वृत्तसेवा :  व्हेल माशाची उलटी सदृश्य पदार्थाची (अंबरग्रिस) तस्करी करणार्‍या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने बुधवारी जेरबंद केले. शामरावनगर परिसरात ही कारवाई केली. त्यांच्याकडून पाच कोटी 79 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये सलीम गुलाब पटेल (वय 49, रा. खणभाग, सय्यद अमीन रोड, सांगली ) आणि अकबर याकुब शेख (51 रा. पिंगोली, मुस्लीमवाडी, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग ) यांचा समावेश आहे. त्यांकडून 5 किलो 710 ग्रॅम वजनाचा व्हेल माशाची उलटी सदृश्य असलेला पदार्थ, एक चारचाकी व दुचाकी जप्त केली आहे.

पोेलिस निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या पथकाला शामरावनगरमधील डॉ. एपीजे अब्दुल कलाम महाविद्यालयानजीक दोन संशयित अंतरराष्ट्रीय बाजारात सर्वाधिक मागणी असलेले व्हेल माशाची उलटी सदृष्य पदार्थाची विक्री करण्याकरिता येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचला. काही वेळात तेथे एक दुचाकीस्वार थांबला. त्याच्याजवळ एक चारचाकी येवून थांबली. त्यामधून उतरलेल्या संशयिताच्या हातात एक पुठ्ठयाचा बॉक्स होता. दोघा संशयितांची वन विभागाकडील अधिकार्‍यांसमक्ष झडती घेतली असता बॉक्समध्ये पिवळसर तांबूस रंगांचे ओबड – धोबड आयताकृती आकाराचे पट्टे पदार्थ असलेले आठ नग आढळले. अकबर शेख यास विचारले असता त्याने, हा पदार्थ व्हेल माशाची उलटी असून मालवण तालुक्यातील आचरा येथील एका साथीदाराच्या मार्फत याची विक्री करण्याकरिता आणल्याची कबुली पोलिसांना दिली.

वनअधिकार्‍यांनी जप्त केलेल्या पदार्थाची प्राथमिक तपासणी करुन तो व्हेल माशाची उलटीसदृश्य पदार्थ असल्याचे तसेच यावर प्रतिबंध घालण्यात आल्याचे सांगितले. पोलिसांनी दोघांनाही अटक केली असून सांगली शहर पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news