

सांगली पुढारी वृत्तसेवा : येथील संजयनगरमधील अभयनगरमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घालत रवींद्र दिलीप काळे यांचा बंगला फोडून पावणेदोन लाखाचे सोन्याचे दागिने लंपास केले. शनिवारी भरदिवसा ही घटना घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध रात्री उशिरा संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
काळे अभयनगरमधील उत्कर्ष हाडको कॉलनीत राहतात. त्याठिकाणी त्यांचा समर्थ नावाने बंगला आहे. शनिवारी मिरजेतील सुभाषनगरमध्ये नातेवाईकांची वास्तूशांती होती. यासाठी ते दुपारी कुटुंबासह गेले होते. दरम्यानच्या काळात चोरट्यांनी त्यांच्या बंद बंगल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराचा कडी व कोयंडा उचकटून आत प्रवेश केला. बेडरुमधील कपाट फोडले. त्यामधील साहित्य विस्कटले. लॉकरचा लॉक तोडला. आतील सोनसाखळी, अंगठ्या यासह अन्य दागिने लंपास केले. एकूण पावणेदोन लाखांचा ऐवज पळविला.
काळे कुटुंब सायंकाळी घरी आल्यानंतर चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर संजयनगर पोलिसांना माहिती देण्यात आली. सहायक पोलिस निरीक्षक संजयनगर क्षीरसागर यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. स्थानिक गुन्हेगारांनी पाळत ठेऊन चोरी केल्याचा संशय आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्याचे फुटेज तपासले जात आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगारांना ताब्यात घेऊन चौकशी केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.
चोरट्यांचा माग काढण्यासाठी घटनास्थळी श्वानपथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. श्वान काळे यांच्या बंगल्यापासून काही अंतरावर जाऊन तिथेच बराच वेळ घुटमळले. ठसे तज्ज्ञांना महत्वाचे ठसे मिळाले आहेत. त्याआधारे तपासाला दिशा देण्यात आली आहे.