

विटा; पुढारी वृत्तसेवा : जमिनीच्या वादातून खानापूर शिवसेनेचे (ठाकरे गट) तालुकाध्यक्ष पांडुरंग तथा दादासाहेब आनंदराव भगत यांच्यावर खुनी हल्ला करण्यात आला. मात्र छातीवर होणारे वार त्यांनी हातावर झेलल्याने ते सुखरूप बचावले. डाव्या हाताला सहा टाके पडले आहेत. ही घटना गुरुवारी सायंकाळी खानापूर येथे घडली. हा हल्ला जावेद मुबारक अत्तार याने केल्याचे विटा पोलिसांनी सांगितले. या घटनेची विटा पोलिसात नोंद झाली आहे.
दादासाहेब भगत हे सायंकाळी खानापूर येथील नगरपंचायतीच्या समोर असणार्या चहाच्या टपरीवर चहा घेत असताना अचानक जावेद हा तिथे आला आणि त्याने "आमची घेतलेली जमीन आम्हाला परत देऊन टाक", असे म्हणून भांडण काढले. त्याच वेळी एका सळीला भाल्यासारखे धारदार बनवून तयार केलेल्या शस्त्राने भगत यांच्यावर हल्ला केला.
अचानक झालेला हा हल्ला भगत यांनी आपला डावा हात पुढे करून अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावर जावेद यांनी आरडाओरडा करीत आणखी दोन तसेच वार केले. मात्र चाललेला आरडाओरडा ऐकून घटनास्थळी गर्दी होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे जावेद याने तेथून पळ काढला. उपस्थित लोकांनी तात्काळ भगत त्यांना भिवघाट करंजे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. दरम्यान या घटनेची विटा पोलिसांमध्ये नोंद झाली असून तपास सुरू आहे.