सांगली : साडेचार वर्षांच्या मुलीवर अल्पवयीन मुलाचा अत्याचार

सांगली : साडेचार वर्षांच्या मुलीवर अल्पवयीन मुलाचा अत्याचार

आष्टा; पुढारी वृत्तसेवा : आष्ट्याजवळील एका गावात 14 वर्षांच्या मुलाने शेजारील 4 वर्षे 4 महिन्यांच्या मुलीवर बलात्कार केला. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, आष्ट्यापासून जवळच असलेल्या एका गावात या मुलांचे पालक शेजारी राहतात. ते एकाच भावकीतील आहेत. शनिवार, दि. 1 एप्रिल रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास या अल्पवयीन मुलाने संबंधित अल्पवयीन मुलीस शेजारच्या घरात बोलावून नेले. त्याठिकाणी तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनंतर मुलीस त्रास होऊ लागला. तिने याची माहिती आईस दिली.

यामुळे गोंधळून गेलेल्या मुलीच्या आईने संबंधित मुलास व त्याच्या पालकांना याचा जाब विचारला. परंतु मुलगी अल्पवयीन असल्याने व बदनामीच्या भीतीने मुलीच्या पालकांनी याची कोठेही तक्रार केली नाही. परंतु मुलीस खूपच त्रास होऊ लागल्याने पालकांनी याबाबतची कल्पना एका नातेवाईकास दिली. त्यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर मुलीच्या आईने याबाबतची फिर्याद आष्टा पोलिस ठाण्यात दाखल केली. त्यामुळे ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी संबंधित अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्याला सांगली येथील बालगुन्हेगार न्यायालयात हजर करून त्याची रवानगी बालगुन्हेगार सुधारगृहात करण्यात येणार आहे. अल्पवयीन मुलीस वैद्यकीय तपासणीसाठी सांगली येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात येणार आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी पद्मा कदम यांनी भेट देवून सविस्तर माहिती घेतली. तपासाबाबत पोलिसांना सूचना दिल्या. तसेच जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.बसवराज तेली यांना या घटनेची माहिती दिली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news