

शिराळा , विठ्ठल नलवडे : शिराळा नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षणामध्ये बदल झाल्याने प्रस्थापितांचे मनसुबे धुळीला मिळाले आहेत. त्यांच्यावर दुसर्या प्रभागातून लढण्याची वेळ आली आहे. नगराध्यक्षपद खुले असल्याने या पदासाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी केली होती, पण त्यांची घोर निराशा झाली आहे.
शिराळा नगरपंचायत निवडणुकीची प्रभाग आरक्षण सोडत झाली. यामध्ये प्रभाग 1 ते 3 हे महिलांसाठी राखीव झाल्याने सर्व इच्छुक पुरुष उमेदवारांना प्रभाग बदलण्याची वेळ आली आहे. तसेच या प्रभागात घरातील महिलांना संधी द्यावी लागणार आहे. प्रभाग 4,6,8,9,12,13 हे प्रभाग सर्वसाधारण पुरूष झाल्याने या प्रभागातील इच्छुकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. इच्छुकांनी मोर्चे बांधनी सुरू केली आहे .
या निवडणुकीत राष्ट्रवादी व भाजप यांच्यात काटा लढत होणार आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे खातेही उघडले नव्हते. या निवडणुकीत काँग्रेस, दलित महासंघ, आरपीआय, मनसे, प्रहार संघटना, शिवसेना पक्ष ही निवडणूक लढवतील. परंतु चुरशीची लढत ही भाजप व राष्ट्रवादीमध्ये होणार आहे.
गेल्या निवडणुकीत सत्यजित देशमुख काँग्रेसमध्ये होते. तर आता ते भाजपमध्ये आहेत. शिवाजीराव नाईक हे भाजपमध्ये होते. ते आता राष्ट्रवादीमध्ये आहेत. नगराध्यक्ष पद खुले असल्याने अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे.
गेल्या नगरपंचायत निवडणुकीत आमदार मानसिंगराव नाईक, सत्यजित देशमुख व शिवाजीराव नाईक यांच्या गटामध्ये निवडणूक झाली होती. त्यावेळी शिवाजीराव नाईक यांच्या गटास सम्राट महाडिक यांच्या गटाने सहकार्य केले होते.
यावेळी आमदार नाईक व शिवाजीराव नाईक गट एकत्र आले असल्याने राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे. तर सत्यजित देशमुख व सम्राट महाडिक हे गट कोणाशी युती करणार हे महत्त्वाचे ठरणार आहे.
शिराळ्यात निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. इच्छुकांकडून बहुतांशी गल्लीबोळातील गोरगरीब तरुण मतदारांचे वाढदिवसही दिमाखात साजरे होऊ लागले आहेत. विविध कामाची उद्घाटने, प्रभागातील नागरिकांच्या गाठीभेटी सुरू आहेत. मागील निवडणुकीत शिवाजीराव नाईक यांच्याबरोबर युती केल्याच्या बदल्यात सम्राट महाडिक यांच्या गटाला स्वीकृत सदस्य म्हणून नगरसेवक केदार नलवडे यांना संधी मिळाली होती. तर राष्ट्रवादीकडून विश्वप्रतापसिंग नाईक यांना संधी देण्यात आली होती.
येणार्या निवडणुकीत सम्राट महाडिक यांना महाडिक युवाशक्तीचे शहरातील अनेक नवीन चेहर्यांची भक्कम साथ मिळणार आहे. त्यामुळे या गटाचा आत्मविश्वास वाढला आहे.
आमदार मानसिंगराव नाईक हे जिल्हा बँकेचे अध्यक्ष झाल्याचा फायदा राष्ट्रवादीला होणार आहे.