

सांगली; पुढारी वृत्तसेवा : सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीसाठी सोमवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी 21 जागांसाठी 44 उमेदवारांचे अर्ज राहिले. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चुरशीची निवडणूक होणार हे स्पष्ट झाले आहे. त्याशिवाय वाळवा तालुका आणि एससी गटातून दोन अपक्ष उमेदवारांचे अर्जही मैदानात राहिले आहेत.
दरम्यान, निवडणुकीची प्रत्यक्ष रणधुमाळी सुरू झाली असून दोन्ही गटांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे. मतदानास अद्याप बारा दिवस असले तरी आऱोप-प्रत्यारोपामुळे आताच चुरस निर्माण झाली आहे. तीन जुलै रोजी मतदान तर पाच जुलैरोजी मतमोजणी होणार आहे.
सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. बँकेसाठी सात वर्षाने वर्षांनी निवडणूक होत आहे. सध्या बँकेत शिक्षक समितीच्या पुरोगामी शिक्षक मंडळाची सत्ता आहे. त्यांच्या विरोधात शिक्षक संघाने शिक्षकांच्या विविध संघटनांना एकत्रीत करून विनायक शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 'स्वाभिमानी प्राथमिक शिक्षक मंडळ' या नावाने पॅनेल तयार केले आहे. सत्ताधारी गटाने आगोदरच उमेदवार जाहीर करीत रविवारी औदुंबर येथे प्रचाराचा धडाक्यात शुभारंभ केला. दुसर्या बाजूला विरोधकांना विविध संघटनांना एकत्रीत करून मोट बांधण्यात यश आले आहे. त्यांनी तीन दिवसांपूर्वी त्यांच्या उमेदवारांची घोषणा केली.
गेल्या वेळची निवडणूक तिरंगी झाली होती. मत विभाजनाचा फायदा सत्ताधारी गटास झाला होता. यावेळी मोठ्या संख्येंने उमेदवारांचे अर्ज होते. त्यामुळे यावेळीही तिरंगी निवडणूक होणार की काय, याबाबत चर्चा होती. मात्र 21 जागांसाठी 44 उमेदवारांचे अर्ज राहिले आहेत. त्यामुळे दुरंगी निवडणूक होणार, हे स्पष्ट झाले. इच्छुकांची नाराजी दूर करण्यात यश आल्याने अर्ज मोठ्या संख्येने माघार घेण्यात आले. मात्र दोघांनी अर्ज मागे घेतले नाहीत. वाळवा खुल्या गटातून आणि एससी गटात हे दोन अपक्षांचे अर्ज आहेत.
एकूण 21 संचालकांमध्ये सर्वसाधारण गटातून 16, अनुसूचित जाती जमाती, इतर मागास प्रवर्ग, आणि भटक्या विमुक्त जाती, जमाती या प्रत्येक गटातून एक तसेच महिलांसाठी दोन जागा राखीव आहेत.
सोमवारी अनेकांनी अर्ज माघार घेतल्याने चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. तालुक्याच्या ठिकाणी बैठका, सभा सुरू झाल्या आहेत.