

इस्लामपूर; संदीप माने : वाळवा तालुक्यातील जि.प. शाळांच्या सुविधांसाठी लोकसहभागातून एक कोटी 70 लाख रुपयांचा निधी जमा झाला आहे. जिल्हा परिषदेने मॉडेल स्कूल संकल्पना राबविली आहे. त्यामुळे शाळांचे रुपडे पालटले आहे. मॉडेल स्कूलसाठी हजारो हात मदतीसाठी सरसावले आहेत.
तालुक्यात जि.प. च्या 195 शाळा आहेत. त्यामध्ये 66 शाळांची मॉडेल स्कूलसाठी निवड केली आहे. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात 25, दुसर्या टप्प्यात 22 शाळांचा समावेश केला होता. त्या शाळांचे काम पूर्ण झाले आहे. तिसरा टप्पा 1 जूनपासून सुरू होणार आहे. त्यामध्ये 19 शाळांचा समावेश केला आहे. शासनाचे अनुदान व लोकसहभागातून जि.प. शाळांचा विकास साधला जात आहे.
मॉडेल स्कूलसाठी जिल्हा नियोजन मंडळाकडून भरघोस निधी दिला जात आहे. या निधीतून हॅण्डवॉश स्टेशन, नवीन खोल्या, खोल्यांची दुरुस्ती, स्वच्छतागृह, संरक्षक भिंत, क्रीडांगण, सोलर पॅनेल, घनकचरा व्यवस्थापन, परसबाग, किचन गार्डन, वृक्ष लागवड, स्वागत कमान, रेन वॉटर हार्वेस्टींग आदी कामे केली जात आहेत.
लोकसहभागातून शाळेची रंगरंगोटी (बोलक्या भिंती), क्रीडा साहित्य खरेदी, पुस्तक खरेदी, प्रयोगशाळा, शाळेसाठी लागणारे फर्निचर आदी कामे केली जात आहेत. त्यासाठी गावातून माजी विद्यार्थी, व्यापारी, प्रतिष्ठित नागरिक यांच्याकडून निधी गोळा केला जात आहे. पहिल्या टप्प्यात 1 कोटी 2 लाख 36 हजार रुपयांचा निधी, दुसर्या टप्प्यात 64 लाख 89 हजाराचा निधी जमा झाला आहे.
जि.प. शाळेच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ झाली आहे. हे विद्यार्थी आता शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवताना दिसत आहेत. 5 वीच्या शिष्यवृत्तीसाठी 174 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. डॉ. पतंगराव कदम शिष्यवृत्तीसाठी झालेल्या परीक्षेत चौथीचे 625 व सातवीचे 117 विद्यार्थी पात्र ठरले.
मॉडेल स्कूल संकल्पनेमुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ झाली आहे. जि.प. शाळेकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. मॉडेल स्कूलचा तिसरा टप्पा जून महिन्यापासून सुरू होणार आहे. लोकसहभागातूनही शाळेचा विकास करण्यावर भर देण्यात येणार आहे.
-अजिंक्य कुंभार, गटशिक्षणाधिकारी, वाळवा