

आष्टा पुढारी वृत्तसेवा : येथील महावितरणच्या अधिकारी व कर्मचार्यांच्या गलथान कारभारामुळे विजेचा धक्का बसून अजित मुकुंद बनसोडे (वय 33, रा. भडकंबे, ता.वाळवा) हा युवक जागीच ठार झाला. गुरूवारी सायंकाळी येथील बसस्थानक चौकात ही घटना घडली. याबाबत आष्टा पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.
घटनास्थळावरून व अजित बनसोडे याच्या कुटुंबियांकडून मिळालेली माहिती अशी, गुरूवारी सायंकाळी येथील बसस्थानक चौक परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे येथील व्यावसायिकांनी याबाबत महावितरणचे अधिकारी व कर्मचारी यांच्याकडे तक्रार केली होती. महावितरणच्या एका वायरमनकडे या तक्रार निवारणाचे काम होते. परंतु या वायरमनने डी.पी.मधून विद्युत पुरवठा खंडित न करताच अजित बनसोडे या कंत्राटी वायरमनला काय फॉल्ट आहे ते बघून त्याची दुरूस्ती करण्यास सांगितले.
अजित हा दुरूस्तीचे काम करण्यासाठी विद्युत खांबावर चढताच त्याला विजेचा जोरदार धक्का बसला. त्याचा जागीच मृत्यू झाला. तो विद्युत खांबावरील तारांना चिकटून बसला होता.
नागरिकांनी महावितरणच्या अधिकारी व कर्मचार्यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर संपूर्ण शहरातील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. क्रेन बोलवून मृतदेह खाली उतरविण्यात आला. आष्टा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. घटनास्थळी व ग्रामीण रुग्णालयात नातेवाईक व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. अजित याच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा असा परिवार आहे. याप्रकरणी वरिष्ठ अधिकार्यांनी या घटनेची चौकशी करून संबंधितावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आष्टा शहर अध्यक्ष शिवाजी चोरमुले यांनी केली आहे.
हेही वाचा