सांगली : वारणेची पूरपरिस्थिती जैसे थे

सांगली : वारणेची पूरपरिस्थिती जैसे थे

चरण; पुढारी वृत्तसेवा : शिराळा पश्चिम भागात पावसाचा जोर कमी झाला असून धरण क्षेत्रात शनिवारी सकाळी 7 वाजता 24 तासात 90 मि.मि.पावसाची नोंद झाली आहे.सध्या वारणा धरणातून सांडवा व विद्युत निर्मितीतून 9365 कुसेक्सने पाणी वारणा नदीत सोडले जात आहे.धरण प्रशासनाने वारणा नदी पात्रातील पाण्याचा विसर्ग जैसे थे ठेवल्याने पूर परिस्थिती 'जैसे थे' अवस्थेत आहे.पावसाचा जोर मंदावल्याने सध्या तरी महापुराचा धोका टळला आहे.

चरण – सोडोंली पूल व आरळा – शित्तूर पुलावर पाणी आल्याने शिराळा व शाहूवाडी तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटल्याने शिराळा तालुक्यातील चरण व आरळा मुख्य बाजारपेठा ठप्प झाल्या आहेत. नदीकाठची पिके गेल्या पाच दिवसापासून पुराच्या पाण्यात गेल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने धरणातील वारणा नदी पात्रातील विसर्ग कमी करावा, अशी मागणी होत आहे.

वारणा, कृष्णा पट्ट्यात पुराची धास्ती

कवठेपिरान : गेल्या काही दिवसांपासून धरण पाणलोट क्षेत्रात धुवाधार पाऊस सुरू आहे. परिणामी वारणा आणि कृष्णा नदीच्या पाणीपातळी झपाट्याने वाढ होत आहे. दुधगाव-खोची बंधारा पाण्याखाली गेला आहे. कवठेपिरान येथील ग्रामदैवताच्या मंदिरातही पाणी शिरले आहे. पाणीपातळीत वाढ झाल्याने मिरज तालुक्याच्या पश्‍चिम भागातील वारणा, कृष्णा पट्ट्यातील ग्रामस्थ धास्तावले आहेत.

2005, 2019 मध्ये आलेला महापुरावेळी कवठेपिरान, दुधगाव, सावळवाडी, माळवाडी, तुंग यासह मिरज पश्‍चिमधील अनेक गावातील हजारो एकर क्षेत्रातील खरीप पिके पाण्यात वाहून गेली होती. कित्येक एकरातील ऊस कुजला होता. त्यामुळे शेतकर्‍यांना लाखों रुपयांचा फटका बसला होता. परिणामी शेतकर्‍यांवर आर्थिक संकट कोसळले. शेकडो घरात, गोठ्यात पाणी शिरल्याने ग्रामस्थांबरोबरच जनावरांचेही हाल झाले होते. धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे वारणा, कृष्णा नद्यांची पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच इतक्या प्रमाणात नद्यांची पाणीपातळी वाढली आहे. कोथळी-समडोळी, दुधगाव-खोची बंधारा पाण्याखाली गेला आहे. नदीकाठावर असणार्‍या शेतातही पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये सध्या घबराटीचे वातावरण आहे.

निवार्‍यासाठी विचारपूस

पूरपट्ट्यात असणारे ग्रामस्थ आपल्या पै-पाहुण्यांकडे निवार्‍यासाठी व्यवस्था करून ठेवत आहेत. जनावरांसाठी पर्यायी व्यवस्था बघण्यात येत आहेत. संपूर्ण नदीकाठावर सध्या पुराची धास्ती असल्याचे चित्र आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news