

तासगाव ; पुढारी वृत्तसेवा : वंजारवाडी (ता. तासगाव) येथील एका धाब्यावर असणार्या वेटर हणमंत श्रीरंग पिसाळ (रा. बावधन, ता. वाई ) याचा खून सुशांत बजरंग जगताप (रा. बस्तवडे, ता. तासगाव) याने तो दारू पिऊन शिवीगाळ करीत असल्याने केल्याचे तपासात समोर आले आहे, अशी माहिती तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक नामदेव तारडे यांनी दिली.
वंजारवाडी येथील दोस्ती ढाब्यावर मयत हणमंत व सुशांत हे वेटर म्हणून काम करीत होते. त्याच्या बरोबर अन्य तिघे कामास आहेत.हणमंत व सुशांत याच्यात नेहमीच दारू पिऊन वाद होत होता. त्यातून हणमंत हा सुशांतला नेहमी शिवीगाळ करायचा. त्यामुळे सुशांत हा चिडून होता. खून झाला त्यादिवशी संकष्टी असल्याने ढाब्याला सुटी होती. सुटी असल्याने हणमंत व सुशांत व अन्य कामगार तासगावला आले होते. दिवसभर ते शहरात दारू पिऊन फिरत होते. सायंकाळी ते ढाब्यावर आल्यानंतर हणमंत आणि सुशांत यांच्यात वाद होऊन एकमेकांना शिवीगाळ सुरू होती. रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमार त्या दोघांमधील वाद विकोपाला गेला.
त्यातून चिडून जाऊन सुशांत याने हणमंत याचा काटा काढायचाच, या उद्देशाने ढाब्यातील स्वयंपाक खोलीत असणारा कांदा चिरायचा चाकू घेऊन त्याच्यावर हल्ला केला. ढाब्यावर असणार्या अन्य कामगारांनी हा वाद सोडविण्याचा प्रयत्न केला, पण दारूच्या नशेत असणार्या सुशांतने कोणालाही न जुमानता हणमंत याच्या गळ्यावर वार केले. गळ्यावर आणि हातावर चाकूने वार झाल्याने हणमंत हा रक्ताच्या थारोळ्यात पडला. अन्य कामगारांनी ही माहिती ढाबा मालक दत्तात्रय खोत याना दिली.
खोत यांनी त्याचा मुलगा श्रीकांत याला याची माहिती दिली. श्रीकांत हा घटनास्थळी आला. त्याने गंभीर जखमी हणमंत याला तातडीने उपचारासाठी तासगाव ग्रामीण रुग्णालयात हलविले.