सांगली : ‘लाचखोर’ जाहले उदंड! … ‘वजना’चा उतारा पडल्याशिवाय ‘साहेब’ करेनात सही

सांगली : ‘लाचखोर’ जाहले उदंड! … ‘वजना’चा उतारा पडल्याशिवाय ‘साहेब’ करेनात सही

सांगली; सचिन लाड :  पद आणि वर्दीचा फायदा घेत असहाय्य लोकांना लुटण्याची महसूल व पोलिस दलात जणूकाही स्पर्धाच लागली असल्याचे चित्र लाचखोरीच्या प्रकरणांतून समोर येत आहे. गेल्या दीड वर्षात तब्बल 55 लाचखोरांना पकडण्यात आले आहे. दिवसेंदिवस असे प्रकार वाढत असल्याने या लाचखोरांनी लाज सोडली असल्याचे दिसून येते.

सांगली, मिरजेसह जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांत भ्रष्टाचार किंवा लाचखोरी विरोधातील फलक झळकत आहेत. तरी जास्त लाचखोरी तिथेच होत असल्याचे लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या कारवायांवरून दिसून येते. 'वजना'चा उतारा पडल्याशिवाय टेबलावरील फायलीला हात लागत नाही, हे आता उघड गुपीत बनले आहे.

गेल्या दोन महिन्यात जत पोलिस ठाण्यातील दोन पोलिसांना 25 हजाराची लाच घेताना पकडले. जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे, अधीक्षक सोनवणे, जलसंपदाचे कार्यकारी अभियंता सूर्यकांत नलवडे, सांगलीवाडीतील कोतवाल, होमगार्ड कार्यालयातील लिपिक जमीर सोलापुरे, महापालिकेच्या नगररचना विभागातील शाखा अभियंता मकबूल उर्फ महम्मद मकानदार हे लाचखोर एका – पाठोपाठ एक लाचलुचपत प्रतिबंध विभागाने लावलेल्या जाळ्यात सापडले आहेेत.

प्रामुख्याने किरकोळ गुन्ह्याच्या तपासात सहकार्य करण्यासाठी पोलिसांनी केलेली लाचेची मागणी, नवीन कामाची निविदा प्रसिद्ध करण्यासाठी लाचेची मागणी, पगार काढण्यासाठी शिक्षकांना वेठीस धरून लाचेसाठी त्यांचे काम थांबविणे, सातबारा उतारा देण्यासाठी लोकांची पिळवणूक करणे, बांधकाम परवाना देण्यासाठी पैशासाठी दोन-दोन वर्षे फायलींवर सही न करणे, होमगार्डला वर्षातून चार महिनेही काम मिळत नाही. कुठे तर मजुरी करून ते कुटुंबाचा गाडा चालवितात. तरीही त्यांच्याकडे लाचेची मागणी करणे, तसेच त्यांनी लाच दिली नाही म्हणून पुनर्नोंदणीचे काम वर्षभर थांबवणे अशा अनेक प्रकरणात सामान्यांची अधिकारी व कर्मचार्‍यांनी पिळवणूक केली. त्यामुळे या पीडित लोकांनी अखेर लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे धाव घेतली होती. यातूनच सहा महिन्यापासून लाचखोरांना पकडण्याची मालिकाच सुरू राहिली आहे.

दरम्यान, अजूनही लाचखोरीच्या तक्रारी येतच आहेत. सर्वसामान्यांनी तक्रारी कराव्यात, यासाठी लाचलुचपत प्रतिबंध विभागाने 'हेल्पलाईन'ही सुरू केली आहे. नागरिकांनी यासाठी पुढे येणे गरजेचे आहे.

विविध कार्यालयातील लहान-मोठे मासे गळाला

महसूल विभागातील – 16, पोलिस-8, महावितरण-5, जिल्हा परिषद-5, जलसंपदा-1, महापालिका-2, होमगार्डमधील लिपिक-1, वन विभाग-2, राज्य उत्पादन शुल्क विभाग-1, सहकार पणन-1, नगर भूमापन-1, पाटबंधारे-1, खासगी व्यक्ती-11. याशिवाय करगणीचे सरपंच यांनाही अटक झाली. चालू वर्षात आजअखेर जवळपास 22 लाचखोरांना पकडण्यात आले आहे.

कारागृहात मुक्काम : जामिनासाठी धडपड

लाच घेताना सापडल्यानंतर दुसर्‍यादिवशी लगेच जामीन मंजूर होतोे, असा लाचखोरांचा गैरसमज होता. मात्र पोलिस उपअधीक्षक सुजय घाटगे हे स्वत: लाचखोरांना न्यायालयाकडून तीन-चार दिवस पोलिस कोठडी घेत आहेत. कोठडीची मुदत संपल्यानंतरही लाचखोरांना जामीन मंजूर होत नसल्याचे चित्र आहे. हे लाचखोर कोल्हापुरातील कळंबा व पुण्यातील येरवडा कारागृहाची हवा खात आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news