सांगली : माझी मराठी कोल्हापुरी, पैलवानी – डॉ.सुधा मूर्ती

सांगली : माझी मराठी कोल्हापुरी, पैलवानी – डॉ.सुधा मूर्ती

सांगली; पुढारी वृत्तसेवा :  महाराष्ट्राची परंपरा तोंडावर सांगायची आहे. तो गुण मला फार आवडतो. माझी मराठी पुणेरी नव्हे तर कोल्हापुरी आहे. माझी मराठी पैलवानी आहे. माझे लेखन कानडीतून झाले असले तरी माझे हृदय मराठी आहे. अनुभव, निष्ठेने व आशादायी लिहिता ते साहित्य लोक वाचतात. त्यातून आपणाला आनंद मिळतो, असे उद्गार ज्येष्ठ व लोकप्रिय लेखिका पद्मश्री सुधा मूर्ती यांनी सांगलीत सोमवारी काढले.

एका संस्थेच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केला होता. ज्येष्ठ मराठी अनुवादिका लीना सोहोनी यांनी सुधा मूर्ती यांच्याशी साहित्य प्रवासविषयी संवाद साधला. येथील विष्णूदास भावे नाट्यगृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी सांगलीकर वाचक प्रचंड संख्येने उपस्थित होते. नाट्यगृहात आणि नाट्यगृहाबाहेरही गर्दी झाली होती.

मूर्ती म्हणाल्या, मी पहिले अक्षर शिकले ते मराठी. माझ्या मनात कुरुंदवाड आणि कोल्हापूरच्या आठवणी कायम आहेत. घर म्हटले की दोनच घरे नजरेसमोर येतात. कुरुंदवाडचे आणि कोल्हापूरचे घर. दोन-अडीच वर्षांची असताना कुरुंदवाडच्या घरात राहायला होते. मी आज कुरुंदवाडच्या घराला 70 वर्षांनी भेट दिली. ते घर पाहिले. कुरुंदवाडच्या कन्या शाळेत शिकले. तिथेही जाऊन आले. सर्व जुन्या आठवणी ताज्या झाल्या. माझे सर्व लेखन कानडी भाषेतून झाले आहे, पण हृदय मराठीच आहे. माझी मराठी कोल्हापुरी आहे.

मूर्ती म्हणाल्या, आईच्या दबावाने लेखनाला सुरुवात झाली. इंजिनिअरिंगला असताना लेखन करायला जमले नाही. टेल्कोत इंजिनिअर म्हणून नोकरीत असताना लिहायला पुन्हा सुरुवात केली.

ऋषी पंतप्रधान म्हणून यशस्वी व्हावेत

सुधा मूर्ती म्हणाल्या, माझे जावई ऋषी सुनाक इंग्लंडचे पंतप्रधान झाले. त्यानंतर अनेकांनी माझ्याशी संपर्क साधून अभिनंदन केले. बधाई हो, असे म्हणाले. पण जावई इंग्लंडचे पंतप्रधान होण्याचे आमचे कॉन्ट्रिब्युशन ते काय? ते सर्व त्यांचे यश आहे. ते चांगले काम करू देत. इंग्लंडचे पंतप्रधान म्हणून ते यशस्वी व्हावेत, एवढीच इच्छा आणि सदिच्छा आहे.

सेल्फ पब्लिशिंग नको

सेल्फ पब्लिशिंग नको, असेही मूर्ती यांनी एका प्रश्नावर सांगितले. माझी नात अनुष्का इंग्लंडमध्ये राहते. दहा वर्षांची आहे. ती लिहिते. लिहू दे, पण त्याचे जास्त कौतुक करायचे नाही, सेल्फ पब्लिशिंग करायचे नाही, असे माझ्या मुलीला सांगितले असल्याचे सुधा मूर्ती यांनी लक्ष वेधले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news