सांगली: मांत्रिकाला अखेर रुग्णालयातून अटक

सांगली: मांत्रिकाला अखेर रुग्णालयातून अटक
Published on
Updated on

सांगली; पुढारी वृत्तसेवा: गुप्तधनाच्या आमिषाने म्हैसाळ (ता. मिरज) येथे वनमोरे कुटुंबातील नऊ जणांची हत्या करणार्‍या आब्बास बागवान याला अखेर मिरज ग्रामीण पोलिसांनी गुरुवारी मिरज शासकीय रुग्णालयातून अटक केली. गेल्या दोन दिवसांपासून छातीत दुखत असल्याचे कारण सांगून त्याचे ढोंग सुरू होते. न्यायालयाने बागवानला 8 जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार असलेला बागवान पोलिस कोठडीत असल्याने आता सर्व बाबींचा उलगडा होईल.

दरम्यान, त्याला शुक्रवारी (1 जुलै) म्हैसाळ येथे घटनास्थळी नेऊन घटनाक्रम जाणून घेण्यात येणार आहे. 20 जून रोजी वनमोरे कुटुंबातील नऊजणांचे मृतदेह आढळून आले होते. कर्जास कंटाळून वनमोरे कुटुंबाने आत्महत्या केल्याचे सुरुवातीला दिसून आले. दरम्यानच्या काळात पोलिसांनी वनमोरे कुटुंबातील सर्वांचे मोबाईल 'कॉल डिटेल्स'काढले. यातून मांत्रिक व गुप्तधानाचा मुद्दा प्रकर्षाने पुढे आल्याने तपासाला कलाटणी मिळाली. मांत्रिक आब्बास मुल्ला व त्याचा साथीदार धीरज सूरवशे या दोघांची नावे यातून निष्पन्न झाली. चार दिवसांपूर्वी दोघांना सोलापुरातून अटक करण्यात आली.

सूरवशेला पोलिस कोठडीत मिळाली. तर बागवानने छातीत दुखत असल्याची तक्रार केल्याने त्याला मिरज शासकीय रुग्णालयात दाखल केले. न्यायालयाने त्याला अटक करण्याची परवानगी दिली होती. तरीही त्याचे ढोंग सुरुच राहिले. अखेर पोलिसांनी गुरुवारी वैद्यकीय अधिकार्‍यांशी चर्चा केली. त्याला काहीच झाले नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे त्याला लगेच अटक करुन न्यायालयात उभे करण्यात आले. पोलिसांनी त्याला 15 दिवस पोलिस कोठडी देण्याची विनंती केली. यावर न्यायालयाने नऊ दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. त्याची व सूरवशे याची स्वतंत्रपणे चौकशी करण्यात येत आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषचे पथकही तपास करीत आहे.

तपासातील 14 मुद्द्यांवर घेतली पोलिस कोठडी

बागवानने नऊजणांची हत्या करण्याचा कट कधी व कुठे रचला? कटात आणखी कोणाचा सहभाग आहे का? गुन्हा करताना घातलेले कपडे? मृत कुटुंबासोबत त्याचे पैशाचे कोणते व्यवहार झाले आहेत? डॉ. माणिक व पोपट वनमोरे यांच्या खिशात सापडलेली 'सुसाईड नोट' कोणी लिहिली? आदी 14 मुद्द्यांवर बागवानची पोलिस कोठडी घेण्यात आली आहे

पोलिसी खाक्या टाळण्यासाठी दोन दिवस ढोंग

नऊ जणांच्या हत्येप्रकरणी पोलिसी खाक्याचा दणका आता जोरात बसणार, याची जाणीव असल्याने बागवानने छातीत दुखत असल्याचे दोन दिवस ढोेंग केले. अगदी जनरल वार्डातून अतिदक्षता विभागात दाखल होण्यासाठी त्याने प्रयत्न केला; पण डॉक्टरांनी 'तो फिट' असल्याचे सांगताच पोलिसांनी त्याला अखेर रुग्णालयातून अटक केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news