सांगली : महापालिकेचे 743 कोटींचे बजेट मंजूर

सांगली : महापालिकेचे 743 कोटींचे बजेट मंजूर
Published on
Updated on

सांगली : पुढारी वृत्तसेवा

महानगरपालिकेचे सन 2022-23 चे महसुली व भांडवली जमा-खर्चाचे 743.39 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक (बजेट) बुधवारी महासभेत सुचनांसह मंजूर करण्यात आले. करवाढ, दरवाढ सुचवलेली नाही. घरपट्टी व पाणीपट्टीचे एकत्र बिल दर सहा महिन्यांनी नागरिकांना देण्याचा निर्णय झाला. नळजोडणी नसलेल्या इमारतींना दर दोन महिन्याला 320 रुपये याप्रमाणे पाणीपट्टी आकारण्याचा तसेच पीपीपी तत्त्वावर नळांना पाणीमीटर बसवण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

स्थायी समितीचे सभापती निरंजन आवटी यांनी सन 2021-22 चे सुधारित व सन 2022-23 चे प्रस्तावित वार्षिक अंदाजपत्रक महासभेत सादर केले. महापौर दिग्विजय सूर्यवंशी अध्यक्षस्थानी होते. उपमहापौर उमेश पाटील, आयुक्त नितीन कापडणीस, अतिरिक्त आयुक्त दत्तात्रय लांघी तसेच पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी उपस्थित होते. विषयपत्रिकेचे वाचन नगरसचिव चंद्रकांत आडके यांनी केले.

महापालिका क्षेत्रातील पाणीपट्टी, घरपट्टी बिलांचे एकत्रिकरण करून दोन सहामाहीमध्ये एकत्रित बिले नागरिकांना देण्याचा निर्णय झाला. महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार महापालिका क्षेत्रातील ज्या मालमत्ताधारकांनी नळ जोडणी केलेली नाही, अशा मालमत्तांना दर दोन महिन्याला किमान 320 रुपये पाणीपट्टी आकारण्याचा निर्णय झाला.

नळांना मीटर बसवल्यास पाण्याचे योग्य मोजमाप होईल. तोटा कमी होईल. त्यासाठी पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) तत्त्वावर पाणीमीटर बसवण्यास मान्यता दिली. टॉवर, जाहितराती फलकांचे कर मालमत्ता बिलातून होणार वसूल अनेक मोबाईल टॉवर, जाहिराती फलकांचे कर थकित आहेत. त्यामुळे परवानगी मूळ मालकाच्या नावे द्यावी व त्याचे शुल्क मूळ मालकाच्या मालमत्ता बिलातून वसूल करावे. खासगी जागेतील फलक व मोबाईल टॉवर उभारल्याची नोंद मूळ मालकाच्या नावे नोंद करण्यास मान्यता देण्यात आली. घरपट्टी बिलातून मालमत्ता विभागाकडील व्यवसाय कराची मागणी करण्यास व नोंदवण्यास तसेच तीनही शहरात फुड झोन तयार करण्यास समिती स्थापन करण्यासाठी मान्यता देण्यात आली.

महापुरूष व नेत्यांचे पुतळे, स्मारक विकसन, स्टेडियम

मिरज विभागीय कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा मिरज गणेश तलावात छत्रपती संभाजी महाराज पुतळा, शिल्पसृष्टी सांगलीत छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा बसवणे. सांगलीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन बांधणे. संभाजीमहाराज शौर्य क्रीडा स्पर्धा. यशवंतराव होळकर चौक विकसन माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांचे स्मारक विकसित करणे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, लोकनेते राजारामबापू पाटील, डॉ. पतंगराव कदम, मदनभाऊ पाटील यांचे स्मारक विकसित करणे. पद्मभूषण वसंतदादा पाटील समाधीस्थळ विकसित करणे. (स्व.) बिजलीमल्ल संभाजीआप्पा पवार स्मृती कुस्ती स्पर्धा कुपवाड येथे मदनभाऊ पाटील मिनी स्टेडियम.

  • अंदाजपत्रकातील ठळक नवीन योजना, संकल्प, तरतुदी
  • सावित्रीबाई फुले प्रोत्साहनपर बक्षिस योजना : महापालिका शाळेतील पाचवी पास व 60 टक्के गुण असणार्‍यांना सायकल
  • सिंधुताई सपकाळ कन्या योजना : एक व दोन मुलींवर कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया करणार्‍या दाम्पत्यास प्रत्येकी 10 हजार
  • ठेव पावती
  • आशा वर्कर यांना सायकल वाटप तीनही शहरात ट्रिमिक्स रस्ते
  • चौक सुशोभिकरण सांगली, मिरज, कुपवाडमध्ये वाणिज्य संकुल
  • मिरज दर्गा विकास सांगली, मिरज, कुपवामध्ये जलतरण तलाव
  • मिरज बालगंधर्व नाट्यगृहात ऐतिहासिक संग्रहालय उभा करणे
  • मिरज येथे मध्यवर्ती निदान केंद्र, प्रभाग 3 मध्ये एमपीएससी, युपीएससी अभ्यासिका, गांधी चौकात तिरंगा झेंडासाठी 30 मीटर पोल
  • सफाई कर्मचार्‍यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजना

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news