

तासगाव; दिलीप जाधव : महांकाली साखर कारखान्याने अगोदर कर्जाचे सर्व पैसे भरावेत, अशी भूमिका जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाने घेतली होती. त्यानंतर 31 मार्चपूर्वीच 101 कोटी रुपये भरण्याचे हमीपत्र कारखान्याने बँकेकडे सादर केले आहे. 'डीआरटी' च्या आदेशाला स्थगिती मिळावी, यासाठी बँकेने धावपळ सुरू केली आहे. जिल्हा बँकेच्या वरिष्ठ अधिकार्यांनी मुंबईत वकिलांशी चर्चा केलेली आहे. 'डीआरटी'चे वरिष्ठ न्यायालय असलेल्या मुंबई येथील 'डीआरएटी' मध्ये आज स्थगितीसाठी अपील दाखल करणार असल्याचे समजते.
महांकाली साखर कारखाना 100 टक्के कर्जमुक्त करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँक, कारखाना आणि शिव लँडमार्क प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड यांनी त्रिपक्षीय करार करावा. यानंतर बँकेने महांकाली कारखान्याच्या अतिरिक्त 80 एकर जमीनीची विक्री करण्यास परवानगी द्यावी, असे स्पष्ट आदेश कर्ज वसुली न्यायाधिकरणने (डीआरटी) देऊन सुध्दा जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाने बैठकीत 'डीआरटी'चे आदेश धुडकावून लावला.
'डीआरटी' च्या निर्णयानंतर जिल्हा मध्यवर्ती बँक याबाबतीत नेमकी काय भूमिका घेणार, याकडे संपूर्ण जिल्ह्यासह साखर उद्योगाचे लक्ष लागले होते. गुरुवारी झालेल्या बैठकीमध्ये काही संचालकांनी 'डीआरटी'च्या आदेशाप्रमाणे त्रिपक्षीय करार करण्याची भूमिका मांडली. काही संचालकांनी आणि बँकेच्या अधिकार्यांनी मात्र 'डीआरटी'चा निर्णय एकतर्फी झाला आहे. निर्णयामुळे बँकेच्या कर्जवसुली अधिकारावरच गदा आलेली आहे. बँकेने निर्णयाच्या विरोधात 'डीआरएटी' मध्ये जावून दाद मागावी. या आदेशाला स्थगिती घेण्याची मागणी केली.
महांकाली कारखान्याने 31 मार्चपूर्वी 101 कोटी रुपये भरावेत. त्यानंतरच आम्ही त्रिपक्षीय करार करू, असा निर्णय जिल्हा बँक संचालक मंडळाने घेतला. त्यानंतर कारखान्याने वकील आणि शिव लँडमार्क प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या संचालकांशी चर्चा करून 31 मार्चपूर्वीच आम्ही 101 कोटी रुपये जिल्हा मध्यवर्ती बँकेत भरत आहोत, असे हमीपत्र सादर केले.
महांकाली कारखाना अडचणीत असताना कर्मचार्यांनी नेहमीच संचालक मंडळाला साथ दिलेली आहे. दुष्काळी भागातील हा कारखाना चालू राहावा यासाठी अनेकदा सहा – सहा महिने पगार न मिळूनही कामगारांनी हा कारखाना बंद पडून दिला नाही. काही अडचणीमुळे गेले तीन वर्षे बंद असलेला कारखाना पुन्हा सुरू होण्याची आशा निर्माण झाली आहे. कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँक व कारखाना या दोघांनीही दोन – दोन पावले पुढे येऊन सहकार्य करण्याची भूमिका घ्यावी. जेणेकरून कामगारांच्या घरातील विझत चाललेल्या चुली पुन्हा एकदा कायम पेटत्या राहतील.
– शंकर कदम, कार्याध्यक्ष, साखर कारखाना कर्मचारी संघटना