सांगली : मनोरुग्ण महिलेकडून मूर्तीचा भंग; मिरजेतील प्रकार

सांगली : मनोरुग्ण महिलेकडून मूर्तीचा भंग; मिरजेतील प्रकार
Published on
Updated on

मिरज; पुढारी वृत्तसेवा : मिरजेत एका मनोरुग्ण महिलेकडून बुधवारी मूर्तीची विटंबना करण्यात आली. या घटनेनंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या. संघटनांनी रस्त्यावर उतरत सर्व दुकाने बंद करण्यास भाग पाडले. घोषणाबाजी करत जमाव शहरातून फिरत होता. त्यानंतर जमावाने पोलिस ठाण्यात जाऊन ठिय्या मारला. त्या ठिकाणीही जमाव शांत होण्यास तयार नव्हता. दरम्यान, पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी संशयित महिलेला ताब्यात घेतल्याची घोषणा केल्यानंतर जमाव शांत झाला.

याबाबत माहिती अशी ः लोणी बाजारात सुमारे शंभर वर्षांपूर्वीचे हनुमान मंदिर आहे. बुधवारी सकाळी मंदिरातील पूजा झाल्यानंतर मंदिराचे दार उघडे होते. दुपारी बारा वाजता मंदिरातील मूर्तीची विटंबना झाल्याचे स्थानिकांच्या लक्षात आले. मंदिरासमोर कार्यकर्ते जमा झाले. त्यानंतर निषेधाच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या. त्यावेळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून कार्यकर्त्यांशी चर्चा केली. जमाव पोलिसांचे काहीही ऐकण्याच्या स्थितीत नव्हता. त्यामुळे जमावाने हा प्रकार करणार्‍या समाज समाजकंटकांना अटक होईपर्यंत मिरज बंदची हाक दिली. यामुळे शहरातील प्रमुख बाजारपेठांतील दुकाने पटापट बंद होवू लागली.

जमाव शहरातून झेंडे घेवून घोषणा देत फिरत होता. दुकाने बंद करण्याचे आवाहन करण्यात येत होते. त्यामुळे शहरात तणाव निर्माण झाला. शहरातील महाराणा प्रताप चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत जमावाने निषेध मोर्चा काढला. यावेळी जमाव पोलिस ठाण्यात देखील गेला. त्या ठिकाणी घोषणा देत समाजकंटकावर कठोर कारवाई करा, त्याशिवाय गप्प बसणार नाही, अशी भूमिका हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घेतली. संशयिताला लवकरच ताब्यात घेण्यात येईल, शांतता राखा, असे आवाहन करून देखील आक्रमक जमाव दुकाने बंद करत छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे गेला.

या चौकात नगरसेवक पांडुरंग कोरे, निरंजन आवटी, करण जामदार, मोहन वनखंडे, चंद्रकांत मैगुरे, गजेंद्र कुळ्ळोळी, आनंद रजपूत, किरण रजपूत, विजय शिंदे, परशुराम चोरगे, सुनिता मोरे उपस्थित होते. गुरुवारी सकाळी पुन्हा एकत्र जमून बंद करण्याचे आवाहन करण्यात आले. परंतु, या प्रकरणात संशयित महिलेला ताब्यात घेतल्याची माहिती मिळाल्यानंतर जमावाने हा निर्णय मागे घेतला.

प्रार्थनास्थळांभोवती बंदोबस्त

शहरातील पार्थना स्थळे, संवेदनशील ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात आहे. पोलिसांचे गोपनीय पथक प्रत्येक कार्यकर्त्यांच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून होते. जमाव ज्या मार्गावरुन घोषणा देत निघाला होता, त्या मार्गावर पोलिस छावणीचे स्वरुप आले होते.

वरिष्ठ अधिकार्‍यांसह पोलिसांची धाव

विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अप्पर पोलिस अधीक्षक, सहायक पोलिस अधीक्षक, पोलिस उपअधीक्षक, 12 पोलिस निरीक्षक यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण, गोपनीय, सीआयडी, विशेष यांच्या पथकांनी तत्काळ मिरजेत धाव घेतली.

जमावाचे चित्रीकरण

मिरजेत जमाव आक्रमक झाल्यानंतर पोलिसांनी यापूर्वीची घटना लक्षात घेता जमावाचे तातडीने चित्रीकरण करण्यास सुरुवात केली. मोर्चा मार्गावर देखील प्रत्येकाचे बारकाईने चित्रीकरण करण्यात येत होते.

किती वाजता काय घडले

11.30 ः मूर्ती विटंबना झाल्याचे उघड
12.30 ः हिंदूत्ववादी संघटना घटनास्थळी
1.30 ः जमाव आक्रमक
2.30 ः जमावाची बैठक
3.30 ः मोर्चा/बंदचा निर्णय
4.00 : पोलिस ठाण्यावर जमावाचा मोर्चा
5.00 : सरफकट्टा मार्गे जमावाचा मोर्चा
5.30 : संशयित पकडल्याचा खुलास

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news